Maharashtra Rain : भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असल्याची माहिती दिली आहे. हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे काल राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. दरम्यान आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी राज्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
आज आणि उद्या राज्यातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस ?
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या मराठवाड्यातील चार जिल्ह्यांसाठी, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा आणि
दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे उर्वरित 27 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अर्थातच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्हे, मराठवाड्यातील उर्वरित चार जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील उर्वरित जिल्हे, उत्तर कोकणातील जिल्हे आणि मुंबईसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उद्या अर्थातच 25 सप्टेंबरला राज्यातील सांगली, कोल्हापूर हे दोन जिल्हे वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील 34 जिल्ह्यांपैकी रायगड आणि पुणे या दोन जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.