Maharashtra Rain : गेल्या तीन-चार दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात थोडीशी वाढ झालेली आहे. काही ठिकाणी थंडीचे प्रमाण पूर्णपणे कमी झाले आहे. थंडी गायब झाली असून राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात ही परिस्थिती पाहायला मिळतेय.
भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रावर पावसाचे सावट कायम राहणार असा अंदाज दिला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यात सर्वाधिक पाहायला मिळाला.
तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला. कर्नाटक मध्येही गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावलीये.
दरम्यान तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये सुरू असलेल्या याच पावसाचा प्रभाव महाराष्ट्राच्या हवामानावर दिसून येत असून राज्यातील मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाने हजेरी लावलीये.
विशेष बाब म्हणजे आजही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज पाच डिसेंबर रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असून आज दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आणि दक्षिण मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांचे विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी जाणकारांनी केले आहे. दरम्यान, उद्या सहा डिसेंबरला देखील राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आहे यावेळी सारी केला आहे.
शनिवारी सुद्धा महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र असे असले तरी पावसाचे प्रमाण हे तामिळनाडू सारखे राहणार नाही. राज्यात फारच किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार असे आयएमडीतील तज्ञांचे म्हणणे आहे.