Maharashtra Rain : 23 सप्टेंबर पासून सुरू झालेला परतीचा पाऊस महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. परतीच्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला असून यामुळे सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे देखील या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अहमदनगरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने पावसा संदर्भात आणखी एक नवीन अंदाज जारी केला आहे. या नवीन अंदाजात हवामान खात्याने महाराष्ट्रात आज देखील तुफान पावसाची शक्यता वर्तवली आहे.
आज राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होईल आणि या अनुषंगाने सदर जिल्ह्यांना हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तथापि उद्यापासून राज्यातील पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याची शक्यता आहे. शनिवारपासून पावसाचा जोर ओसरणार असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ञांनी दिला आहे.
आज शुक्रवारी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून फारच आवश्यक काम असेल तेव्हाच घराबाहेर पडावे अन्यथा घरातच थांबावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दिवसभर पाऊस सुरू राहणार आहे. सरीवर सरी पडतच राहणार आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी उत्तर कोकणातील पालघर, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगरसह, जालना, बीड, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक राहणार आहे.
या भागात आज दिवसभर पाऊस पडत राहणार असा अंदाज असून या पार्श्वभूमीवर या सर्व जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
तसेच, कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, जळगाव, विदर्भ विभागातील बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमधेही जोरदार पावसाची शक्यता आहे.
या अनुषंगाने या सदर जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. म्हणून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.