Maharashtra Rain : जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरे तर पंजाबरावांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी 16 तारखेपासून महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल आणि 19 तारखेपासून पावसाचा जोर वाढणार, जोरदार पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला होता.
यानुसार महाराष्ट्रात सध्या जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू झाला आहे. काही ठिकाणी गारपीट झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारपीट आणि काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
यामुळे आता महाराष्ट्रात सुरू असणारा हा पाऊस नेमका कधी थांबणार, कडाक्याच्या थंडीला कधी सुरुवात होणार ? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, याच संदर्भात पंजाब रावांनी आज एक नवीन माहिती दिली आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज पासून पुढील काही दिवस राज्यात पाऊस सुरूच राहणार आहे. 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
अर्थातच आज पासून पुढील चार दिवस राज्यात चांगला मुसळधार पाऊस पडणार असे पंजाबरावांनी स्पष्ट केले आहे. या काळात सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. दिवसभर ऊन पडेल आणि सायंकाळी तसेच रात्री पाऊस पडणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.
मात्र 23 तारखेपर्यंतच महाराष्ट्रावर पावसाचे सावट राहणार आहे. कारण की, यानंतर पाऊस माघार घेणार आहे. पंजाबरावांच्या हवामान अंदाजावर जर विश्वास ठेवायचे झाले तर यंदा 24 तारखेपासून थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. राज्यात 23 ऑक्टोबर पर्यंत पाऊस पडेल आणि 24 ऑक्टोबरला धुई म्हणजेच धूके येईल आणि त्यानंतर मग थंडीला सुरुवात होईल.
25 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात थंडी जाणवेल असे पंजाब रावांचे म्हणणे आहे. थंडीची तीव्रता मात्र 5 नोव्हेंबर पासूनच वाढणार आहे. अर्थातच दिवाळी झाल्यानंतर राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होईल असे पंजाब रावांनी आपल्या नवीन बुलेटिनमध्ये जाहीर केले आहे.
दरम्यान पंजाबरावांनी या काळात दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची आणि स्वतःची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना रब्बी पिकांची पेरणी करण्यास सुरुवात करावी असा सल्ला देखील दिला आहे. शेतकरी बांधव आता गहू तसेच हरभरा पिक पेरणी सुरू करू शकतात असे पंजाब रावांचे म्हणणे आहे.