Maharashtra Rain : गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील काही भागात पुन्हा एकदा पाऊस झाला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर भागात काही ठिकाणी पाऊस झाला आहे. यातील काही भागात अगदीचं जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगामातील पिकांची नुकतीच पेरणी पूर्ण झाली आहे आणि अशा परिस्थितीतच राज्यातील काही भागात पाऊस झाला असल्याने याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होईल असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामाच्या उत्पन्नावर परिणाम होईल आणि त्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.
दरम्यान आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रात आणखी किती दिवस पावसाचे सत्र सुरू राहील या संदर्भात माहिती दिली आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आज काही ठिकाणी पाऊस होणार आहे. मात्र उद्यापासून राज्यातील पावसाचे सत्र थांबेल आणि थंडीची लाट येणार आहे.
आज 17 नोव्हेंबर रोजी राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अनुषंगाने या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे आज मध्य महाराष्ट्र विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरच्या जतकडे पावसाची शक्यता आहे. यासोबतच कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्येही आज पाऊस होणार असे दिसते तसेच गोव्यातील पणजी या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जाणवत आहे.
मात्र उद्यापासून अर्थातच 18 तारखेपासून महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा कोरडे होणार आहे आणि राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उद्यापासून महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढणार आहे. 19 तारखेपासून राज्यातील अनेक भागांमधील तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस पर्यंत खाली येईल असे सुद्धा पंजाब डख यांनी यावेळी नमूद केले आहे.
मतदानाच्या दिवशी पाऊस पडणार का?
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी कडून जोरदार प्रचार सुरू आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस सुरू आहे मात्र या पावसात सुद्धा नेत्यांकडून प्रचार सुरू आहे. कोल्हापूरमध्ये शरद पवार यांनी भर पावसात सभा घेतली होती. यामुळे अनेकांच्या माध्यमातून मतदानाच्या दिवशी म्हणजेच 20 नोव्हेंबरला राज्यात पाऊस पडणार का याबाबत प्रश्न उपस्थित केला जात होता.
पंजाबरावांनी मात्र येत्या 20 तारखेला म्हणजेच मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही असे स्पष्ट केले आहे. मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील, पाऊस काही पडणार नाही यामुळे मतदानाच्या प्रक्रियेत पावसाचा अडथळा येणार नाही असे स्पष्ट केले आहे.