Maharashtra Rain Live Update : भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून पुन्हा एकदा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. परत एकदा राज्यात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला आहे. जसे की आपणास ठाऊकच आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यात अधून मधून अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे, फळबाग पिकांचे, भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठे नुकसान होत आहे. आधी खरीप हंगामात शेतकऱ्यांच अतोनात नुकसान झाले होते.
आता रब्बी हंगामातील बहुतांशी पिकांचेही अवकाळी पावसाने कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. दरम्यान दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला होता. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात हवामान खराब झाले असून दोन एप्रिल पर्यंत राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
आज 31 मार्च रोजी राज्यातील मुंबईसह कोकणात, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात खान्देशमध्ये ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. यासोबतच दोन एप्रिल पर्यंत विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. निश्चितच ढगाळ हवामान आणि अवकाळी पाऊस यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र असे असले तरी शेतकऱ्यांनी भीती न बाळगता अधिक सजग राहण्याची गरज असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.
हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी खुशखबर! उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; आता मुंबईमधील ‘या’ मेट्रो मार्गाचे काम होणार जलद, वाचा सविस्तर
मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, बुलढाणा, गोंदिया, वाशिम, गडचिरोली या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच मराठवाडा वगळता राज्यातील इतर विभागातील बहुतांशी जिल्ह्यात पाऊस राहणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे मात्र भीती बाळगू नये असं सांगितलं जात आहे.