Maharashtra Vande Bharat Train : भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत ट्रेन संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. येत्या 15 सप्टेंबरला देशाला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंधरा तारखेला 10 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची बातमी समोर आली आहे. ही गाडी नागपूरला देखील मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उपराजधानी नागपूर येथून आधीच ही सेमी हायस्पीड ट्रेन धावत आहे. नागपूरला या चेअर कार प्रकारातील एक नाही तर दोन सेमी हायस्पीड ट्रेन मिळालेल्या आहेत. नागपूर ते बिलासपूर आणि नागपूर ते इंदोर या मार्गांवर ही सेमी हाय स्पीड ट्रेन धावत आहे.
महत्त्वाचे म्हणजे आता पंधरा तारखेला आणखी एक नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. ऑरेंज सिटी म्हणून संपूर्ण भारतात ओळखल्या जाणाऱ्या नागपूरला आता तिसरी वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे इंटिग्रल कोच फॅक्टरी चेन्नईमधून एक रेक रविवारी नागपूरला पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. म्हणजेच नागपूरला वंदे भारत ट्रेन मिळणार हे फिक्स झाले आहे. मात्र याच्या रूट संदर्भात अजून रेल्वे बोर्डाकडून कोणतीच माहिती हाती आलेली नाही.
याचा रूट नेमका कसा राहणार? याबाबत जाणून घेण्याची नागपूरकरांना मोठी उत्सुकता लागली आहे. मीडिया रिपोर्टनुसार ही गाडी नागपूर ते पुणे किंवा नागपूर ते सिकंदराबाद यापैकी कोणत्या तरी एका मार्गावर चालवली जाणार आहे.
या गाडीला 15 सप्टेंबरला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. मात्र या गाडीची वाहतूक सेवा 19 सप्टेंबर 2024 पासून सुरू होईल. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नागपूर ते पुणे दरम्यान अनेक गाड्या धावत आहेत.
या मार्गावर निश्चितच प्रवाशांची संख्या फारच अधिक आहे मात्र या मार्गावर आधीपासूनच खूप गाड्या सुरू आहेत. यामुळे नागपूरला मिळालेली ही गाडी नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर चालवली जाऊ शकते. नागपूर ते सिकंदराबाद या मार्गावर देखील प्रवाशांची संख्या खूपच अधिक आहे.
यामुळे या मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू होण्याची शक्यता दाट आहे. खरे तर आत्तापर्यंत महाराष्ट्राला एकूण आठ वंदे भारत एक्सप्रेस मिळालेल्या आहेत. यातील दोन गाड्या नागपूरहून आणि सहा गाड्या मुंबईहून चालवल्या जात आहेत.
मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, सीएसएमटी ते सोलापूर, सीएसएमटी ते शिर्डी, सीएसएमटी ते जालना, सीएसएमटी ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर ही सेमी हाय स्पीड ट्रेन सुरू आहे.