Mhada Important Decision:- घराच्या बांधकामासाठी नवीन जागा घेणे किंवा नवीन घर बांधणे हे जवळपास आता सर्वसामान्य नागरिकांसाठी अशक्य गोष्ट होऊन बसली आहे. कारण घरांच्या किंवा जागांच्या प्रचंड वाढलेल्या किमतीमुळे घर घेणे शक्य होत नाही. त्यातल्या त्यात मुंबई किंवा पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये तर घर घेणे म्हणजे हवे तितके सोपे काम नाही.
परंतु बऱ्याच नागरिकांचे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये घराचे स्वप्न पूर्ण करण्याच्या संबंधी म्हाडा सारख्या शासनाच्या गृहनिर्माण संस्था मोलाची कामगिरी पार पाडतात. म्हाडाच्या माध्यमातून लॉटरी काढून अनेकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाते.
म्हाडा सोबतच सिडको ही गृहनिर्माण संस्था देखील अशा पद्धतीने सोडत जाहीर करून सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये घरे उपलब्ध करून देते.परंतु आता सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळेल अशा दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाने घेतला असून आता म्हाडा भाडेतत्त्वावर घरे देणार आहे.
यासोबतच आता येणाऱ्या पाच वर्षांमध्ये म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत साधारणपणे अडीच लाख नवीन घरांचे बांधकाम केले जाईल अशा पद्धतीची माहिती समोर आली आहे
व त्यामुळे आता परवडणाऱ्या घरांच्या किमतीत 30 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय देखील म्हाडा घेईल अशी एक शक्यता आहे. परंतु आता या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हाडाची घरे भाडेतत्त्वावर देण्याचा जो काही निर्णय घेतला आहे तो खूप महत्त्वपूर्ण आहे.
म्हाडाची घरे मिळणार भाडेतत्त्वावर
जेव्हा म्हाडाच्या माध्यमातून सोडत प्रक्रिया राबवली जाते तेव्हा बऱ्याचदा नागरिकांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करता येत नाही व त्यामुळे म्हाडाची घरे खरेदी करणे शक्य होत नाही. तसेच मुंबईसारख्या शहरांमध्ये नोकरी किंवा व्यवसायाच्या करिता आणि शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील इतर भागातून अनेक जण येऊन राहतात.
अशा ठिकाणी स्वतःचे घर नसल्याने त्यांना भाडेतत्त्वावर घर घेऊन राहावे लागते. अशा लोकांकरिता आता म्हाडाचा हा निर्णय खूप दिलासादायक ठरणार आहे. मुंबईत भाडेतत्त्वावर घरे उपलब्ध करून देता यावी त्याकरिता आता म्हाडा तयारी करत आहे.
म्हणजेच मुंबईत जे काही नोकरी किंवा शिक्षणासाठी विद्यार्थी येतात व इतकेच नाही तर नोकरी करणाऱ्या महिलांना देखील आता भाडेतत्त्वावर म्हाडाची घरे मिळणार आहेत.
म्हाडा मुंबईत उभारणार तीन हजार हेक्टर जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प
येणाऱ्या कालावधीमध्ये मुंबईत म्हाडाच्या माध्यमातून तब्बल तीन हजार हेक्टर जमिनीवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार असून मुंबई परिसरातील जवळपास 114 विविध सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतींचा पुनर्विकास प्रकल्प देखील म्हाडा राबवणार आहे.
अशाप्रकारे जुन्या इमारतींचा पुनर्विकास झाल्याने मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीकरिता घरांची उपलब्धता होईल. तसेच येणाऱ्या पाच वर्षांमध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अडीच लाख घरे उपलब्ध केली जाणार आहेत.