डेअरी फार्मिंग हा व्यवसाय आता मोठ्या प्रमाणावर केला जात असून नुसता शेतीला जोडधंदा म्हणून न करता आता खूप मोठ्या स्वरूपात व्यावसायिक दृष्टिकोनातून केला जात असलेला व्यवसाय आहे. तसेच यामध्ये आता अनेक प्रकारच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रांचा समावेश झाल्यामुळे डेअरी फार्मिंग व्यवसायाला खूप चांगले दिवस आलेले आहेत. तसेच दुधाला आणि दुग्धजन्य पदार्थांना असलेली बाजारपेठेतील मागणी देखील कायम असल्यामुळे हा व्यवसाय फायद्याचा होताना दिसून येत आहे.
जर आपण डेअरी फार्मिंग व्यवसायाविषयी माहिती घेत असताना पुण्याजवळ असलेल्या देशी गाई जसे की गीर आणि साहिवाल या गाईंचा डेअरी फार्म पाहिला तर त्या ठिकाणी वापरल्या जात असलेले तंत्रज्ञान आणि केलेल्या सुविधा डोके चक्रावणारे आहेत. जवळजवळ 125 एकर परिसरामध्ये विस्तारलेल्या या डेअरी फार्म विषयी आपण माहिती घेऊ.
मित्तल हॅप्पी काऊ डेरी फार्म
पुण्यापासून 45 किलोमीटरवर असलेल्या वडगाव मावळ येथील मित्तल हॅप्पी काऊ डेअरी फार्म असून या ठिकाणी प्रामुख्याने गिर आणि साईवाल या देशी गाईंचे पालन केले जाते. मित्तल हॅपी काऊ डेअरी फार्म हा 125 एकरवर विस्तारलेला असून यातील पंधरा एकर वर गाईंसाठी शेडच्या सुविधा करण्यात आलेले आहेत.
बाकीच्या क्षेत्रावर या फार्ममधील गाईंसाठी लागणाऱ्या चाऱ्याची लागवड केली जाते. आपण प्रामुख्याने पाहतो की बऱ्याचशा डेअरी फार्ममध्ये एचएफ किंवा जर्सी गाईंचे पालन केले जाते. परंतु या फार्ममध्ये प्रामुख्याने साहिवाल आणि गीर गाईंचे पालन करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी देशी गाईंचे संवर्धन केले जाते. कारण आपण संकरित गाईंच्या तुलनेत दूध उत्पादनाचा विचार केला तर देशी गाईंचे दूध देण्याचे प्रमाण संकरित गाईपेक्षा कमी असते
परंतु देशी गायीच्या दुधाचे कॉलिटी ही दर्जेदार आणि उत्तम असते. महत्त्वाचे म्हणजे मित्तल हॅप्पी काऊ डेअरी फार्म मध्ये देशी गाईंची ब्रीडिंग करण्यावर काम सुरू असून विकसित गाय ही जास्त दूध देईल या दृष्टिकोनातून काम करण्यात येत आहे. जवळजवळ या डेरी फार्म ची सुरुवात होऊन पाच वर्षे पूर्ण झालेली आहेत. सध्या स्थितीला या फार्ममध्ये 450 गायी आहेत. विशेष म्हणजे या फार्मची सुरुवात फक्त तीन गाईंना घेऊन करण्यात आलेली होती व पाच वर्षांमध्ये या ठिकाणी तब्बल 450 गाई सध्या स्थितीला आहेत.
संख्या वाढवताना त्यांनी बऱ्याच गाई बाहेरून खरेदी केल्या तसेच त्यांच्या शेड मधील गाईंचे वासरे पुढे चालून दूध देण्यासाठी सक्षम केल्या जातात. या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गाईंना मोकळी जागा मिळावी अशा पद्धतीने सगळ्या फार्मची रचना करण्यात आलेली आहे.
या ठिकाणी तीन ते चार ठिकाणी वेगवेगळ्या शेड उभारण्यात आलेले आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर लहान वासरांसोबत आईचा संपर्क चांगल्या पद्धतीने राहावा याकरिता वेगळा कप्पा, तसेच ज्या गाई पंधरा दिवसांनी व्यायतील अशा गाईंसाठी वेगळा कप्पा, गाई व्यायल्यानंतर वेगळा कप्पा असे वेगवेगळ्या प्रकारचे कप्पे या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. तसेच गिर व साईवाल जातीचे बैल देखील या ठिकाणी असून त्यांच्यासाठी देखील वेगवेगळे कप्पे करण्यात आलेले आहेत.
गाईसाठी आहे फॅन आणि फॉगर्सची सिस्टम
जेव्हा शेडमध्ये प्राणी जास्त असतात तेव्हा त्या ठिकाणाची उष्णता काढण्याकरिता फॅन लावण्यात आलेले आहेत व कुलिंगची व्यवस्थित सुविधा उभारण्यात आलेली आहे. तसेच पाईपांची सिस्टम उभारून त्या ठिकाणी फॉगर्स लावण्यात आलेले असून यामुळे गाईंच्या अंगावर पाण्याचे बारीक फवारे उडतात. त्यामुळे गायींच्या अंगातील उष्णता बाहेर निघण्यास मदत होते. यामागचा उद्देश म्हणजे जेव्हा प्राण्यांना किंवा गाईंना आरामदायी परिस्थिती निर्माण केली जाते त्यामुळे गाई दूध जास्त देतात.
या डेअरी फार्ममधील फीडची वैशिष्ट्यपूर्ण रचना
जेव्हा मिल्किंग साठी गाई जातात तेव्हा या ठिकाणी गाईंच्या ग्रुप नुसार चारा टाकला जातो. गाईंसाठी चारा तयार करण्याकरता वेगळ्या शेडची व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी चारा तयार करण्यासाठी हिरवा चारा, वाळलेल्या चारा आणि इतर महत्वाचे ग्रेन जसे की गहू ज्वारी आणि बाजरी मिक्स केली जाते. विशेष म्हणजे या फार्मवर चारा तयार करताना लागणारा चारा किंवा इतर आवश्यक घटक हे स्वतःच तयार केले जातात. कुठल्याही प्रकारचे बाहेरून खरेदी केली जात नाही. तसेच मका आणि मुरघासचा वापर देखील मोठ्या प्रमाणावर केला जातो.
पाण्याची सुविधा
या शेडमध्ये ऑटोमॅटिक वॉटर ट्रफ लावण्यात आले असून या ठिकाणी जेव्हा गाई पाणी पिण्यासाठी जातात तेव्हा पाणी येते आणि पाणी पिऊन झाल्यानंतर ऑटोमॅटिक पाणी बंद होते. हे सगळे टेक्नॉलॉजी स्वीडनची असून या डेरी फार्ममध्ये बऱ्याच प्रकारची टेक्नॉलॉजी ही स्वीडनची आहे. या वॉटर टफमध्ये पाणी सर्क्युलेट होते व त्यामुळे ते खराब होत नाही व गाईंना स्वच्छ पाणी प्यायला मिळते.
मलमुत्राची विल्हेवाट
कशी लावली जाते?या ठिकाणी जे काही मलमूत्र असते त्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढले जाते व डम्प केले जाते व पुढे त्या ठिकाणाहून मधून पाणी आणि पावडर वेगळी केली जाते. स्लरीमधून जी पावडर वेगळी केली जाते ती गांडूळ खत तयार करण्याकरिता त्याचा वापर केला जातो. तसेच उरलेले लिक्विड एका समोरच्या टाकीमध्ये जाते व त्या ठिकाणाहून शेतीमधील इतर पिकांसाठी वापरले जाते.
या स्लरी मधून पाणी आणि पावडर वेगळे करण्यासाठी सेपरेटरचा वापर करण्यात आला आहे. या पावडरचा वापर गांडूळ खत तयार करण्यासाठी केला जातो व गांडूळ खताची विक्री देखील या ठिकाणाहून केली जाते. बाकीचे गांडूळ खत हे स्वतःच्या शेतासाठी वापरले जाते व उरलेले इतर शेतकऱ्यांना सात रुपये किलो या दराने विकले जाते.
रोज किती वाजता दूध काढले जाते?
दररोज सकाळी चार वाजेपासून या ठिकाणी दूध काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. या ठिकाणी देखील एक मजेशीर गोष्ट असून जेव्हा जनावरांना मिल्किंग म्हणजे दूध काढण्यासाठी आणले जाते तेव्हा गाई पाण्याच्या शॉवर खालून आणल्या जातात. त्यामुळे जनावरांच्या अंगातील उष्णता बाहेर निघण्यास मदत होते. त्यानंतर काऊ होल्डिंग म्हणजेच गाई थांबण्याचा एरिया बनवण्यात आला आहे व त्याच ठिकाणी त्या गाईंचे वासरे आणले जातात.
बारा गाईंचे दूध एका वेळेस या ठिकाणी काढले जाते. दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन चा वापर केला जातो. दूध काढण्यासाठी कुठल्याही मानवी हस्तक्षेप या ठिकाणी केला जात नाही. दूध काढल्यानंतर लगेच जनावरांना चार वाजता चारा टाकला जातो. एवढ्या सकाळी दूध काढण्यामागे देखील एक तत्त्वज्ञान असून सकाळी गाई फ्रेश मूडमध्ये असतात व दूध देखील चांगलं देतात. दोन वेळेच्या दूध काढण्यामध्ये 12 तासाचे अंतर ठेवले जाते.
एका दिवसाचे दुधाचे उत्पादन
सध्या या डेरी फार्म मध्ये 200 ते 250 गाई दूध देतात. यामध्ये एका दिवसाला पंधराशे ते सोळाशे लिटर दुधाचे उत्पादन होते. या दुधाचे पाशरायझेशन या ठिकाणी केले जाते. त्यानंतर त्या दुधाची पॅकिंग केली जाते. तसेच या ठिकाणीचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या फार्मवरनं दूध सरळ ग्राहकांना दिले जाते.
विशेष म्हणजे या ठिकाणाचे दूध शंभर रुपये लिटर या दराने विक्री केली जाते. नंतर या पॅकिंग दुधाचे वितरण करण्याकरिता गाड्यांचे माध्यमातून दुधाचे वितरण पुण्यात केले जाते. पुण्यामध्ये या डेरी फार्म ची ऑफिस असून या ऑफिस समोर या गाड्या उभ्या राहतात व त्या ठिकाणहुन डिलिव्हरी बॉय त्यांच्या त्यांच्या दुधाच्या ऑर्डर घेऊन विक्रीसाठी नेतात. महत्वाचे म्हणजे दुधाची बुकिंग ही एप्लीकेशनच्या माध्यमातून केली जाते.
मिस्टर मिल्क नावाचे त्यांचे ॲप असून या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांनी सबस्क्राईब केल्यानंतर जे ही प्रॉडक्ट ग्राहकांना मागवायचे आहे ते एप्लीकेशनच्या माध्यमातून बुक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरपोच डिलिव्हरी पोचवली जाते. याशिवाय या डेअरी फार्मच्या माध्यमातून दही, तूप तसेच बटरमिल्क आणि पनीर इत्यादी उत्पादने देखील तयार केले जातात.
अशा पद्धतीने अनेक अत्याधुनिक प्रकारचे तंत्रज्ञान या मित्तल हॅप्पी काऊ डेरी फार्मवर वापरण्यात आले आहे.