अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 PM modi :- स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून भाषण करतात.
यावर्षी मात्र गुरूवारी (२१ एप्रिल) दुसऱ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून भाषण करणार आहेत.
शीख गुरू तेग बहादुर यांच्या चारशेव्या प्रकाश पूरबनिमित्त केंद्र सरकारने बुधवारी आणि गुरुवारी लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.
हा कार्यक्रम सध्या सुरू असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा हा एक भाग असेल. या कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या निमित्तानं एक टपाल तिकीट आणि नाण्याचं लोकार्पणही होणार आहे. यावेळी चारशे शीख कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत.
विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवरांनाही या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलं आहे. अलीकडेच झालेली पंजाब राज्यातील विधानसभा निवडणूक आणि त्यात भाजपचा झालेला पराभव या पार्श्वभूमीवर होणाऱ्या या कार्यक्रमाकडं राजकीय निरीक्षकांचंही लक्ष लागलं आहे.
एरवी स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्यावरून आणि इतरवेळी मन की बात या कार्यक्रमातून आकाशवाणीवरून देशाला संबोधित करणारे पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार आहेत. ते काय बोलणार? याकडं लक्ष लागलं आहे.