Monsoon 2024 : मान्सून 2024 संदर्भात एक मोठी अपडेट समोर येत आहे. यंदा आतापर्यंतच्या मान्सून काळात देशात सरासरीपेक्षा आठ टक्के जास्त पाऊस झाला. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यात जेवढा पाऊस झाला आहे तेवढा पाऊस संपूर्ण मान्सून काळात देखील होत नाही.
यावरून यंदाचा मान्सून किती दमदार आहे याचा अंदाज सहज बांधता येतो. मात्र देशात पावसाचे असमान वितरण झाले आहे हे सुद्धा तेवढेचं खरे आहे. राज्यात सुद्धा ही परिस्थिती अनुभवायला आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये जास्तीचा पाऊस झाला आहे, तर काही ठिकाणी सरासरी एवढा पाऊस झाला आहे.
संपूर्ण देशाचा विचार केला असता उत्तर-पश्चिम भारत, मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडलाय तर पूर्व आणि ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1 जून ते 29 सप्टेंबर दरम्यान संपूर्ण देशात सरासरी 932.2 मिमी पाऊस पडलाय.
तर, दीर्घकालीन सरासरी 865 मि.मी. अशा प्रकारे ते सामान्यपेक्षा 7.8 टक्के अधिक आहे. या आकडेवारीमुळे यंदाचा मान्सून हा 2020 नंतरचा सर्वोत्तम मान्सून ठरला असल्याचे हवामान तज्ञांनी जाहीर केले आहे.
गेल्या वर्षी महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली होती आणि यामुळे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची देखील समस्या तयार झाली होती. राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख धरणे कोरडी झाली होती.
यंदा मात्र मान्सून काळात दमदार पाऊस झाला असून राज्यातील जवळपास सर्व धरणे फुल झाली आहेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने मान्सून 2024 संदर्भात एक मोठी माहिती दिली आहे.
ला निना च्या प्रभावामुळे यंदा मान्सूनच्या शेवटी आणखी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळेच मान्सून परतण्यास विलंब होत असल्याचेही आयएमडीने स्पष्ट केले आहे आहे.
याचा अर्थ देशाच्या काही भागांमध्ये पावसाळा सामान्यपेक्षा जास्त काळ टिकू शकतो. साधारणपणे 15 ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण देशातून मान्सून काढता पाय घेत असतो. पण यंदा हवामान अभ्यासाकांनी अगदी सुरुवातीपासूनच मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणारा आणि मान्सूनचा मुक्काम अधिक काळ राहणार असे स्पष्ट केले होते.
यानुसार यंदाचा मान्सूनचा परतीचा प्रवास हा जवळपास एक आठवडा लांबला आहे. यामुळे आता मान्सून संपूर्ण देशातून कधीपर्यंत माघार घेणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.