Monsoon 2024 : कालपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पश्चिम राजस्थान आणि कच्छ मधून काल मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला. दरम्यान महाराष्ट्रातही पाऊस सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, धुळे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासहित अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात देखील पाऊस सक्रिय झाला आहे. कोकणात तर आधीपासूनच हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. अशातच आता भारतीय हवामान खात्याने आगामी तीन दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या नवीन अंदाजानुसार राज्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.
अर्थातच मानसून जाता जाता महाराष्ट्राला चांगलाच झोडपून काढणार आहे. दरम्यान आता आपण पुढील तीन दिवस महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे राहणार पुढील तीन दिवसाचे हवामान?
24 सप्टेंबर 2024 : आज अर्थात 24 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्वच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. अर्थात काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे.
मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, कोकणातील दक्षिणेकडील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर अधिक राहणार असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हे नऊ जिल्हे वगळता राज्यातील उर्वरित 27 जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
25 सप्टेंबर : उद्या सुद्धा महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उद्या राज्यातीलच 34 जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला असून यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज आणि काही जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळालेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उद्या सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार अशी शक्यता आहे. पण, कोकणातील दक्षिणेकडील रायगड जिल्ह्यासाठी आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यासाठी उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित 32 जिल्ह्यात मात्र येलो अलर्ट राहणार आहे.
26 सप्टेंबर : 26 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रातील नाशिकला जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना येलो अलर्ट मिळालेला आहे. कोकणातील पालघर ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भातील सर्वच्या सर्व 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.