तब्बल ७४ वर्षांच्या बहुप्रतिक्षेनंतर खासदार नीलेश लंके यांच्या रूपाने पारनेरच्या भूमिपुत्राने सोमवारी, २४ जुन रोजी संसदेत पाहिले पाऊल टाकले. संसदेत पारनेरला कधी प्रतिनिधीत्व मिळणार ? या प्रश्नाचे उत्तर खा. नीलेश लंके यांनी इतिहास घडवत दिले असून मंगळवारी संसदेमध्ये शपथ घेण्यासाठी लंके यांचा २९८ हा क्रमांक निश्चित करण्यात आला आहे.
सन १९५१ मध्ये पहिली लोकसभा अस्तित्वात आली. त्यानंतर पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणूकांमध्ये स्व. कॉ. बाबासाहेब ठुबे यांनी कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने तर स्व. सॉ. गुलाबराव शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविली. मात्र दोन्ही निवडणूकांमध्ये पारनेरच्या या भूमिपुत्रांना यश आले नाही. काँ. बाबासाहेब ठुबे यांनी कोपरगांव लोकसभा मतदारसंघातून कम्युनिष्ट पक्षाच्या वतीने निवडणूक लढविताना स्व. बाळासाहेब विखे यांनी त्यांना मदतीचा शब्द दिला होता. प्रत्यक्षात मात्र विखे यांची फौज भाजपाचे उमेदवार वसंतराव गुंजाळ यांच्या पाठीशी गेल्याचा आरोप कम्युनिष्ट कार्यकर्ते आजही करत आहेत. अर्थात त्या निवडणूकीत स्व. बाबासाहेब ठुबे यांचा मोठा पराभव झाला असला तरी भाजपाचे उमेदवार वसंतराव गुंजाळ यांनाही यश मिळू शकले नव्हते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभेच्या एकत्रीत निवडणूकीसाठी शरद पवार यांच्या आग्रहाखातर स्व. सॉ. गुलाबराव शेळके यांनी निवडणूक लढविली. विधानसभेला तत्कालीन आमदार वसंतराव झावरे हे रिंगणात होते. लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार गोविंदराव आदिक तर विधानसभेसाठी स्व. ज्ञानदेव पठारे हे होते. त्यावेळी स्व. बाळासाहेब विखे यांनी शिवसेनेच्या वतीने निवडणूक लढवून ती जिंकली. शिवसेनेचे सबाजीराव गायकवाड हे विधानसभेचे उमेदवार म्हणून त्यांच्यासोबत होते, तर मा. आ. नंदकुमार झावरे हे अपक्ष म्हणून रिंगणात होते. या निवडणूकीत लोकसभेमध्ये स्व. गुलाबराव शेळके यांच्यासह गोविंदराव आदिक हे पराभूत झाले. विधानसभेला वसंतराव झावरे यांनी विजय संपादन केला. सबाजीराव गायकवाड व नंदकुमार झावरे हे पराभूत झाले होते.
स्व. शेळके यांना ऐनवेळी उमेदवारी
स्व. बाबासाहेब ठुबे यांच्यापेक्षा स्व. गुलाबराव शेळके हे लोकसभा निवडणूकीत विजयी होतील अशी पारनेरकरांना अपेक्षा होती. परंतू पारनेरकरांकडूनही त्यांना फारशी साथ लाभली नाही. इतर तालुक्यांमध्येही स्व. शेळके हे अपेक्षित मते घेऊ शकले नाहीत. अर्थात स्व. शेळके यांना ऐनवेळी निवडणूकीच्या रिंगणात उतरविण्यात आल्याने पक्षाच्या यंत्रणेवरच त्यांना विसंबून रहावे लागले. दुसरीकडे विखे यांची यंत्रणा सक्षम असल्याने त्यांनी या निवडणूकीत सहज विजय संपादन केला.
लंके यांच्याकडून खासदारपदाचे गिफ्ट
सन २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत नीलेश लंके हे उमेदवार असणार याची कुणकूण सुमारे अडिच तिन वर्षांपूर्वीच लागली होती. शरद पवार यांनी लंके यांनी ही निवडणूक लढवावी असा शब्द टाकला होता. पवारांचा शब्द प्रमाण माणून लंके यांनी संपूर्ण मतदारसंघात संपर्क वाढविला होता. त्याचाच फायदा त्यांना झाला. त्यांनी डॉ. सुजय विखे यांच्यासारख्या बलाढय उमेदवाराचा पराभव करत पारनेरकरांना खासदारपदाचे गिफ्ट दिले. अर्थात पारनेरकरांनीही लंके यांना सर्वाधिक मताधिक्य देत आपली भूमिका चोखपणे निभावली.