Mukhyamantri Annapurna Yojana : गेल्या काही दिवसांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून शिंदे सरकारने महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा केलीये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना या अशाच महत्त्वाकांक्षी योजना आहेत. यातील लाडकी बहिण योजनेचा प्रत्यक्षात लाभही मिळाला आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात. अर्थातच एका पात्र महिलेला एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळतो. जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली असून आत्तापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या पाच महिन्यांचे पैसे जमा झालेले आहेत.
आगामी दिवाळी सणाचा कालावधी पाहता शिंदे सरकारने नोव्हेंबर महिन्याचे पैसे ऍडव्हान्स मध्ये पात्र महिलांच्या खात्यात जमा केले आहेत. आता या महिलांना या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर महिन्यातच दिला जाणार आहे.
अशातच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत.
मात्र या योजनेचा लाभ ज्या महिलांच्या नावावर गॅस सिलेंडर आहे त्यांनाच दिला जाणार आहे. दरम्यान आता याच योजने संदर्भात पुणे जिल्ह्यातून एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत 6390 महिला अन्नपूर्णा योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे अजूनही एक हजार 919 लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अन्नपूर्णा योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या आणखी वाढणार आहे. तथापि या योजनेअंतर्गत एका कुटुंबात (रेशन कार्डनुसार) केवळ एकाच महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, उज्ज्वला योजनेंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलिंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम (सरासरी ८३० रु.) ग्राहकांकडून घेतली जाते. त्यानंतर केंद्र सरकारकडून ३०० रुपये अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य सरकारकडून दिले जाणारे उर्वरित ५३० रुपयांचे अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करायचे आहेत. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांना अन्नपूर्णा योजनेमध्ये तेल कंपन्यांनी पहिल्या ३ सिलिंडरसाठी लाभार्थ्यांकडून पूर्ण रक्कम वसूल करावी.
त्यानंतर राज्य सरकारकडून अंदाजे ८३० रुपये प्रतिसिलिंडर ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा केले जाणार आहेत. या योजनेमुळे महागाईने त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही वर्षात गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेत अशा परिस्थितीत अन्नपूर्णा योजनेचा सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.