Mumbai Bullet Train : भारतात एकूण आठ बुलेट ट्रेन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. यापैकी तीन बुलेट ट्रेन आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहेत हे विशेष. देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प देखील आपल्या महाराष्ट्रातीलच आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट हा देशातील पहिलाच प्रोजेक्ट आहे. सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. याशिवाय मुंबई-पुणे-हैदराबाद आणि मुंबई ते नागपूर दरम्यान बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे.
यापैकी मुंबई ते हैदराबाद दरम्यानच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा डीपीआर रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र या प्रकल्पाला अजून मंजुरी मिळालेली नाही. गेल्या दोन वर्षांपासून या प्रकल्पाचा डीपीआर रेल्वे मंत्रालयात धुळखात पडून आहे. येत्या काळात मात्र या डीपीआरला देखील रेल्वे मंत्रालयाची मंजुरी मिळेल आणि याचेही काम लवकरच सुरू होईल अशी आशा आहे.
दुसरीकडे देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात म्हणजेच मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकल्पाचे काम कुठपर्यंत आले आहे, आतापर्यंत या प्रकल्पातील कोणकोणती कामे पूर्ण झाली आहेत याबाबतची माहिती समोर येत आहे.
देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम किती झाले
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीचे 100% भूसंपादन पूर्ण झाले आहे. गुजरात, दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्रातून ही बुलेट ट्रेन धावणार असून यासाठी लागणाऱ्या जमिनीच्या 100% भूसंपादन पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पाचे सिव्हिल वर्क युद्धपातळीवर सुरू असून रेल्वेस्थानकं, रेल्वेचे पूल, बोगदे आणि कारशेडचं काम वेगाने चालू आहे. सध्या या प्रकल्पांतर्गत दमण गंगा, पार, औरंगा, खरेडा, वेंगनिया, अंबिका, पूर्णा, मिंढोला, माही, मोहार, साबरमती, तापी व नर्मदेसह अनेक नद्यांवर पुलाची उभारणी केली जात आहे.
यापैकी काही पुलांचे काम पूर्ण झाले आहे तर काही पुलांचे काम बाकी आहे. या प्रकल्पांतर्गत घणसोली, शिळफाटा, वलसाड येथे बोगदे विकसित केले जाणार आहेत. आतापर्यंत या बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले असून बोगद्यांमधील रुळ, वीज जोडणीसह इतर आवश्यक कामे देखील सुरु झाली आहेत.
या अंतर्गत 21 किलोमीटर लांबीचा वांद्रे-कुर्ला संकुल ते शीळफाटा (डोंबिवली) दरम्यान बोगदा विकसित केला जाणार आहे. यापैकी सात किलोमीटर लांबीचा बोगदा हा समुद्रा खालून राहणार असून हा देशातील पहिलाच सर्वाधिक लांबीचा समुद्राखालील बोगदा राहील असे म्हटले जात आहे.
दुसरीकडे बुलेट ट्रेन च्या स्थानकाचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. वापी, बिलिमोरा, सुरत, भारूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, साबरमती या ठिकाणी बुलेट ट्रेन चे स्थानक विकसित होत आहेत. या स्थानकांचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे.
एकंदरीत देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम जलद गतीने सुरू आहे. हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. यामुळे याचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा 2026 पर्यंत पूर्ण होईल असे म्हटले जात आहे. म्हणजे 2026 अखेरपर्यंत मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यावर बुलेट ट्रेन सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे येत्या दोन वर्षांनी बुलेट ट्रेन प्रत्यक्षात रुळावर धावणार आहे.