Mumbai Expressway News : महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची शहरे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख प्राप्त आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राज्य राजधानी सुद्धा आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखतात. मुंबई आणि पुणे येथील नागरिक नियमित कामानिमित्ताने बेंगलोरला जातात.
शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी मुंबई आणि पुणे येथील जनता बेंगलोरला नियमितपणे जाते. दरम्यान मुंबई आणि पुण्यावरून बेंगलोरला जाणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भविष्यात मुंबई ते बेंगलोर वाया पुणे हा प्रवास अवघ्या सहा तासात पूर्ण होईल असा विश्वास आता सरकारकडून व्यक्त केला जात आहे.
नितीन गडकरी यांनी स्वतःच ही माहिती दिली आहे. गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई ते बेंगलोर चा प्रवास वेगवान व्हावा यासाठी एका नव्या महामार्गाची उभारणी केली जाणार आहे.
मुंबई ते बंगळुरूपर्यंत जो नवीन महामार्ग तयार होणार आहे त्या नव्या महामार्गाने या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास अवघ्या 6 तासांत होईल, याबाबत महिनाभरापूर्वीच निर्णय झाला असून सुशासन आणि शास्वत विकासासाठी भाजप कटिबद्ध आहे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.
सध्या मुंबईहून पुण्याला जाण्यासाठी नागरिकांना तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतोय. तसेच पुण्याहून पुढे बेंगलोरला जाण्यासाठी तब्बल 14 ते 15 तासांचा वेळ लागतो. मुंबईहून पुण्याला दररोज हजारोंच्या संख्येने नागरिक ये-जा करत असतात. तसेच मुंबईहून बेंगलोरला आणि पुण्याहून बेंगलोरला जाणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे.
याच अनुषंगाने आता केंद्रातील सरकारने एका नव्या महामार्गाची उभारणी करण्याचा निर्णय घेतला असून याबाबतचा निर्णय नुकत्याच काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला आहे. हा महामार्ग तयार झाल्यानंतर मुंबई ते बेंगलोर दरम्यानच्या प्रवासाचा बहुतांशी वेळ वाचणार असून सर्वसामान्यांना या महामार्गाचा फायदा होईल अशी आशा आता व्यक्त होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की गडकरी यांनी आधी या महामार्गाचा उल्लेख केला होता. याबाबत बोलताना गडकरी यांनी असे म्हटले होते की, मुंबईच्या अटल ब्रीजवरून खाली उतरल्यानंतर मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गाला समांतर असा नवा महामार्ग लवकरच तयार होणार आहे.
पुणे, सातारा, सांगली, बेळगाव असा हा मार्ग असेल, असा रोड मॅप देखील त्यांनी जाहीर केला होता. या नव्या महामार्गापैकी 307 किलोमीटरचा मार्ग आपल्या महाराष्ट्रात आणि 493 किलोमीटर कर्नाटकात राहील अशी माहिती त्यांनी दिली.
या महामार्गामुळे मुंबईहून पुण्याला अवघ्या 90 मिनिटात म्हणजेच दीड तासात पोहोचता येईल, तिथून पुढे बंगळुरूला साडेचार ते 5 तासांत जाणं शक्य होईल. या महामार्गासाठी तब्बल 60000 कोटी रुपयांचा खर्च होणार हे विशेष. यामुळे दोन आयटी शहर म्हणजेच बेंगलोर आणि पुणे एकमेकांना जोडले जाणार आहेत.