Mumbai Metro News : महाराष्ट्रात मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये विविध मेट्रो प्रकल्पाची कामे सुरू आहेत. मुंबई पुणे नागपूरमधील काही भाग आधीच मेट्रो ने जोडला गेला आहे तर काही भाग आगामी काळात मेट्रो ने जोडला जाणार आहे. पुण्याबाबत बोलायचं झालं तर पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो सुरु असून भविष्यात या मार्गांचा विस्तार होणार आहे.
दुसरीकडे देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत अर्थात मुंबईमध्ये सध्या 59.19 किलोमीटर मेट्रो धावत आहे आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 143.65 किलोमीटरवर काम सुरू आहे. अशातच आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर मेट्रोचा विस्तार व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला एक नवीन टारगेट सुद्धा दिले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरातील मेट्रोची कनेक्टिव्हिटी आणखी वाढावी यासाठी एमएमआरडीएला मुख्यमंत्री महोदयांनी एक महत्त्वाचे टार्गेट दिले असून यामुळे आगामी काळात मुंबईमधील मेट्रोचे नेटवर्क हे आणखी स्ट्रॉंग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सह्याद्री अतिथिगृहात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणची (MMRDA) आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्रात दरवर्षी 50 किलोमीटर लांबीचे मेट्रोचे मार्ग तयार झाले पाहिजेत अशी आग्रही भूमिका व्यक्त केली आहे. म्हणजेच राज्यातील काही शहरांमध्ये आगामी काळात मेट्रोचा झपाट्याने विस्तार होताना दिसणार आहे.
दरवर्षी 50 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग तयार करण्याचे टार्गेट मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली असल्याने आगामी काळात मुंबई मधील मेट्रोची कनेक्टिव्हिटी आणखी वाढणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण मुंबई शहरात आणि उपनगरात कोणकोणत्या मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे आणि त्या मेट्रो मार्गांचे सध्या स्थितीला किती काम पूर्ण झाले आहे याचा लेखाजोखा आजच्या या लेखातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबईत या मेट्रो मार्गांचे काम सुरू आहे
मेट्रो 12 अंतर्गत कल्याण ते तळोजा दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाणार असून याचे काम काम हाती घेण्यात आले आहे.
मेट्रो 10 अंतर्गत गायमुख ते शिवाजी चौक – मीरा रोड दरम्यान मेट्रो मार्ग विकसित केला जाणार असून मूळ मेट्रोचं एक्सटेंन्शन असलेल्या गायमुख स्थानकापासून ठाण्याला मीरा रोडशी जोडणाऱ्या या मेट्रो मार्गावरील काम अद्याप सुरू झालेलें नाही.
मेट्रो 2 बी अंतर्गत डीएन नगर ते मंडाले असा मेट्रो मार्ग तयार केला जाणार असून या प्रकल्पाचे 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्प अंतर्गत जवळपास 23.6 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग विकसित होणार आहे.
मेट्रो 4 आणि 4 ए अंतर्गत वडाळा ते कासरवडवली आणि गायमुखपर्यंत मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाचे सुद्धा आत्तापर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मेट्रो 5 अंतर्गत ठाणे – भिवंडी – कल्याण असा मेट्रो मार्ग विकसित होणार असून या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा 24.9 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग राहणार असून यामुळे मुंबईमधील मेट्रोची कनेक्टिव्हिटी फारच मजबूत होण्याची शक्यता आहे.
मेट्रो 6 अंतर्गत स्वामी समर्थ नगर – विक्रोळी दरम्यान मेट्रो मार्ग तयार केला जाईल. हा 15.5 km लांबीचा मेट्रो मार्क राहणार असून या प्रकल्पाचे आतापर्यंत 77 टक्के काम पूर्ण झाले आहे.
मेट्रो 9 आणि 7 ए अंतर्गत दहिसर पूर्ण – मीरा-भाईंदर – अंधेरी पूर्व – सीएसएमआयए असा मेट्रो मार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर याचे सध्या स्थितीला 92 टक्के काम पूर्ण झालं आहे. उर्वरित आठ टक्के काम देखील युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी सुरू होणार आहे.