Mumbai Metro News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईमधील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग प्रकल्प पुढील महिन्यात सुरु होण्याची शक्यता आहे. मुंबई शहरात मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी या अनुषंगाने शहरात मेट्रो सुरू करण्यात आली आहे. अजूनही अनेक मार्गांवरील मेट्रोचे काम सुरू आहे.
तसेच काही मार्गांची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. याचे काम हे जवळपास पूर्ण झाले असून येत्या काही दिवसांनी या मार्गावर प्रत्यक्षात मेट्रो सुरु होणार आहे. मीडिया रिपोर्ट नुसार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या मेट्रो मार्गाचा पहिला फेज म्हणजेच आरे ते बीकेसी मेट्रो मार्ग मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
विशेष बाब अशी की या मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई मेट्रो 3 हा एकूण ३३.५ किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. मात्र हा संपूर्ण मेट्रो मार्ग एकाच वेळी प्रवाशांच्या सेवेत येणार नाही.
सुरुवातीला या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा मुंबईकरांसाठी खुला केला जाणार आहे. आरे ते बीकेसी हा 12 किलोमीटर लांबीचा टप्पा सुरुवातीला खुला केला जाईल. या पहिल्या टप्प्यात एकूण दहा स्थानकांचा समावेश आहे. या संपूर्ण मेट्रो मार्गावर एकूण 27 स्थानके आहेत आणि यापैकी 26 स्थानके भूमिगत आहेत.
फक्त एकच स्थानक जमिनीवर आहे. अर्थातच संपूर्ण मेट्रो मार्ग भूमिगत आहे. या भूमिगत मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा आता वाहतुकीसाठी सुरू होणार आहे. पहिला टप्पा पुढील महिन्यात सुरू होईल आणि या प्रकल्पाचा दुसरा टप्पा हा जून 2024 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे.
खरेतर, या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2021 अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही आणि यामुळे प्रकल्पाचा खर्च हजारो कोटींनी वाढला.
तथापि आता या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा म्हणजेच आरे ते बीकेसी हा 12 किलोमीटर लांबीचा टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे.
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेट्रो मार्गाचे उद्घाटन करणार आहेत. तथापि या मार्गाच्या उद्घाटनाची तारीख अजून समोर आलेली नाही. यामुळे या मार्गाचे उद्घाटन कधीपर्यंत होणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.