Mumbai Metro News : राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर या शहरांमध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी मेट्रो सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, मुंबईमधील मेट्रो मार्गासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
खरे तर मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच मुंबई उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान हीच वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात आणि उपनगरात विविध मेट्रो मार्गांचे काम हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान मुंबईकरांना येत्या नव्या वर्षात आणखी एका नव्या मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. नवीन वर्षात शहरातील एक महत्त्वाचा मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वडाळा ते कासारवडली मेट्रो 4 हा मार्ग नव्या वर्षात प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकतो. या मार्गीकेवरील एका महत्त्वाच्या टप्प्याचे काम नुकतेच संपन्न झाले आहे. या मेट्रो मार्गावर चार यू गर्डरची उभारणी करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मेट्रो 4च्या पॅकेज 12 मधील कापूरबावडी मेट्रो स्थानक हे मेट्रो 4 आणि 5 या दोन मेट्रो मार्गिकांचे एक इंटीग्रेटेड स्थानक आहे.
गेल्या आठवड्यात याचं स्थानकाच्या भागात चार गर्डरची उभारणी करण्यात आली आहे. यामुळं आता मेट्रो 4 आणि मेट्रो 5 मार्गिकेवरील स्थानकांचे इंटीग्रेशन सहज शक्य होणार आहे.
वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो 4 मार्गामुळे ठाणेकरांना वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात घोडबंदर ते मुलुंड दरम्यान मेट्रो धावणार आहे.
मेट्रो लाइन 4 म्हणजे वडाळा ते कासारवडवली आणि मेट्रो लाइन 4 अ मध्ये कासारवडवली ते गायमुख अशा मार्गिका तयार करण्यात येणार आहेत.
हा प्रकल्प डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. म्हणजेच नव्या वर्षात ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.