Mumbai-Nagpur Expressway : राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलं आहे. या समृद्धी महामार्गापैकी पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी हा गेल्या वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे आता या समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई पूर्णपणे बांधून केव्हा तयार होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. याबाबत आता एक मोठी माहिती देखील हाती आली आहे.
खरं पाहता राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतलेला समृद्धी महामार्ग 701 किलोमीटर लांबीचा आहे. या महामार्गासाठी 55 हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा डिसेंबर 2022 मध्ये सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आहे. हा पहिला टप्पा एकूण 520 किलोमीटर लांबीचा असून यामुळे नागपूर ते शिर्डी हे अंतर अवघ्या पाच तासात पार करता येणे प्रवाशांना शक्य होत आहे.
यामुळे नागपूर ते शिर्डी दरम्यानचा प्रवास गतिमान झाला असून याला प्रवाशांची पसंती देखील मिळत आहे. अशातच आता उर्वरित मार्गाचे काम देखील सद्यस्थितीला जलद गतीने सुरू आहे. शिर्डी ते मुंबई मधील आमने यादरम्यान चे काम सध्या स्थितीला सुरू आहे. या उर्वरित मार्गाचे देखील एकूण तीन टप्प्यात काम केले जात आहे. शिर्डी ते भरवीर, भरवीर ते इगतपुरी आणि इगतपुरी ते आमने म्हणजेच मुंबई अशा एकूण तीन टप्प्यात या उर्वरित मार्गाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पूर्ण केले जात आहे.
या तिन्ही टप्प्यांपैकी शिर्डी ते भरविर या टप्प्याचे काम मार्च महिन्यात पूर्ण होणार आहे तसेच भरवीर ते इगतपुरी या टप्प्याचे काम जून महिन्यात पूर्ण करण्याचा मानस एम एस आर डी सी ने बोलून दाखवला आहे. विशेष म्हणजे या टप्प्यांपैकी शेवटचा आणि अति महत्त्वाचा टप्पा म्हणजेच इगतपुरी ते मुंबई मधील आमने यादरम्यानचे काम देखील जलद गतीने सुरू असून याच टप्प्याचे काम 79 टक्के पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे हा टप्पा डिसेंबर अखेर वाहतुकीसाठी खुला करण्याचं टार्गेट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ठेवल आहे.
म्हणजेच समृद्धी महामार्ग पूर्णपणे डिसेंबर अखेर बांधून तयार होणार असून वाहतुकीसाठी देखील खुला केला जाणार आहे. या ठिकाणी एक विशेष गोष्ट अशी की इगतपुरी ते आमने हा टप्पा बांधण्यासाठी सर्वात आव्हानात्मक असा टप्पा आहे. कारण की या टप्प्यात एकूण 12 बोगदे तयार केले जाणार आहेत. यापैकी एक बोगदा तब्बल आठ किलोमीटर लांबीचा आहे तर उर्वरित 11 बोगदे हे प्रत्येकी एक किलोमीटर लांबीचे आहेत. या बोगद्यांचे काम कसारा घाटात सुरू असून या बोगद्यांमुळे कसारा घाट मात्र पाच ते सहा मिनिटात पार करता येणे शक्य होणार आहे.
या बोगद्यांव्यतिरिक्त या महामार्गावर 16 उंच पूल देखील बांधले जात आहेत. यापैकी नाशिकमधील वशाळा येथे सर्वात उंच पूल तयार होत आहे. या पुलाचे खांब तब्बल 275 फूट उंचीचे असल्याचे सांगितले गेले आहे. यामुळे इगतपुरी ते आमने हेच काम सर्वाधिक चॅलेंजिंग आणि शेवटच्या टप्प्याचे काम आहे. दरम्यान या टप्प्याचे काम 79 टक्के पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाने कंबर कसली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या आव्हानात्मक टप्प्याचे काम देखील डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. निश्चितच हा देखील टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला तर संपूर्ण समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला होईल आणि मुंबई ते नागपूर हा प्रवास प्रवाशांना करता येईल. समृद्धी महामार्ग बांधून तयार झाल्यानंतर मुंबई ते नागपूर हे अंतर मात्र आठ तासात पार होणार असल्याने प्रवाशांचा मोठा वेळ या ठिकाणी वाचणार आहे.