Mumbai Nagpur Expressway : महाराष्ट्राच्या एकात्मिक विकासाला चालना देण्यासाठी राज्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. काही विकास कामे अंतिम टप्प्यात आहेत. समृद्धी महामार्गाचे कामदेखील अंतिम टप्प्यात आले आहे.
मुंबई ते नागपूर दरम्यानच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा हा गेल्या वर्षी अर्थातच डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करकमलाद्वारे सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता.
पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी (520 किलोमीटर) प्रवाशांसाठी खुला झाल्यानंतर या महामार्गाचा दुसरा टप्पा केव्हा सुरू होतो? याकडे विशेष लक्ष लागून होते. दरम्यान या महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी ते भरविर या 80 किलोमीटर मार्गाचे काम पूर्ण झाले असून हा टप्पा 26 मे 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पित केला जाणार आहे.
हा लोकार्पण सोहळा साहजिकच हायटेक बनवला जाणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा समृद्धी महामार्गाचे उर्वरित कामदेखील जलद गतीने पूर्ण करण्याचा मानस असून संपूर्ण समृद्धी महामार्ग हा डिसेंबर 2023 पर्यंत सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, शिर्डी ते भरवीरपर्यंतच्या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून यासाठी तयारी युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे.
लोकार्पण सोहळा हायटेक बनवण्यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळ प्रयत्न करत आहे. खरं पाहता, या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण यापूर्वीच होणार होते मात्र मुख्यमंत्री महोदय यांना लोकार्पणासाठी वेळ मिळत नव्हता.
मात्र आता 26 मे 2023 रोजी दुपारी 3 वाजता मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते हा मार्ग प्रवाशांसाठी खुला होणार असून यामुळे नागपूर ते भरवीर पर्यंतचा प्रवास आता मात्र सहा तासात पूर्ण होणार आहे.