Mumbai News : मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुंबईत एक नवा लिंक रोड तयार होणार असून यामुळे भाईंदर ते विरार दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या नव्या रोडचा आराखडा तयार केला आहे. उत्तन (भाईंदर) ते विरार दरम्यान 55 किमी लांबीच्या नवीन लिंक रोडसाठी एमएमआरडीएने आराखडा तयार केला आहे.
या नव्या प्रकल्पाचा आराखडा तयार झाला असल्याने आगामी काळात या प्रकल्पाचे काम सुरू होईल आणि नियोजित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा आहे. 55 किलोमीटर लांबीच्या या नवीन रस्त्यामध्ये 24 किलोमीटरचा सागरी मार्ग असेल. हा रोड 19.1 मीटर रुंद असेल अन यात 5 लेन असतील.
आता याचा आराखडा तयार झाला असल्याने लवकरच हा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. 55 किमीचा हा नवीन रस्ता बीएमसीने बांधलेल्या कोस्टल रोडला जोडला जाईल. मंडळी वर्सोवा ते भाईंदरमधील उत्तन दरम्यान कोस्टल रोड बनवला जात आहे.
आता याच कोस्टल रोडला उत्तन ते विरार या दरम्यान तयार होणारा नवीन लिंक रोड जोडला जाणार आहे. यामुळे वर्सोवा ते विरार हा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान या नव्या प्रकल्पाबाबत एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी यांनी मोठी माहिती दिली आहे.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ५५ किलोमीटर लांबीच्या नवीन लिंक रोड प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. सध्या डीपीआरच्या आढाव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आढाव्याचे काम पूर्ण होताच डीपीआर मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला जाईल.
या प्रकल्पामुळे कोस्टल रोडला जोडणी मिळणार आहे. हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर वर्सोवा ते विरार हा प्रवास अवघ्या ४५ मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या वर्सोवा ते विरार दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
वाहतूक कोंडीमुळे मुंबईकर अक्षरशा हैराण होत आहेत, पण हा नवीन प्रकल्प या भागातील वाहतूक कोंडी सोडवणार आहे. नव्या लिंक रोड प्रकल्पाला तीन ठिकाणी कनेक्टर दिले जाणार आहेत. वसई, विरार आणि उत्तनमध्ये कनेक्टर बांधले जातील.
५५ किलोमीटरच्या मार्गाचा डीपीआर तयार करण्यासोबतच एमएमआरडीए प्रकल्पाच्या विस्तारीकरणाच्या आराखड्यावरही काम करत आहे. सरकारला उत्तन ते विरार हा रस्ता पालघरपर्यंत वाढवायचा आहे.
म्हणजेच वर्सोवा ते भाईंदर हा प्रवास कोस्टल रोडमुळे वेगवान होणार आहे पुढे नव्या लिंक रोड मुळे भाईंदर ते विरार दरम्यानचा प्रवास वेगवान होईल आणि त्यानंतर पालघरपर्यंतच्या विस्तारामुळे पालघर पर्यंतचा प्रवास हा सुपरफास्ट होणार आहे. म्हणजेच भविष्यात वर्सोवा ते पालघर हा प्रवास प्रवाशांना कमी वेळेत पूर्ण करता येणार आहे.