Mumbai Pune Expressway : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. भविष्यात मुंबई ते पुणे यादरम्यानचे अंतर उल्लेखनीय कमी होणार असून प्रवासाचा कालावधी देखील घटणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी 25 मिनिटे आधी पोहोचता येणार आहे.
प्रवासाचा वेळ कमी व्हावा यासाठी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मिसिंग लिंक विकसित होत आहे. आता, याचं प्रकल्पाच्या कामा संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राज्यातील दोन मोठ्या शहरांमधील अंतर सुमारे सहा किमीने कमी होणार आहे. यामुळे या दोन्ही शहरा दरम्यानचा प्रवास अर्धा तास लवकर होणार अशी आशा आहे.
मुंबई-पुणे अंतर कमी करण्यासाठी देशातील सर्वात उंच केबल पूल दोन पर्वतांमध्ये बांधण्यात येत आहे. दरम्यान, आता आपण या प्रकल्पाचे काम कधीपर्यंत पूर्ण होणार आणि हा प्रकल्प नेमका कसा आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा आहे हा प्रकल्प?
मिळालेल्या माहितीनुसार, मिसिंग लिंक प्रकल्पातील एक महत्त्वाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. खरेतर मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) 13.3 किमी लांबीचा नवीन मार्ग तयार करत आहे.
यामध्ये दोन बोगदे आणि दोन केबल ब्रिज बांधले जात आहेत. 13.33 किमीपैकी 11 किमी लांबीचा बोगदा आणि सुमारे 2 किमीचा केबल पूल आहे. एमएसआरडीसीच्या म्हणण्यानुसार दोन्ही बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झाले आहे.
सध्या बोगद्याच्या आत फिनिशिंगचे काम सुरू आहे. दुसरीकडे केबल पूलचे काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आले आहे. मुंबई-पुणे अंतर कमी करण्यासाठी देशातील सर्वात उंच केबल पूल दोन पर्वतांमध्ये बांधण्यात आला आहे.
केबल पूल जमिनीपासून सुमारे 183 मीटर उंच आहे. हा पूल 80 टक्के पूर्ण झाला आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट दरम्यानचे सध्याचे अंतर 19 किमी आहे. पण, मिसिंग लिंकच्या बांधकामामुळे 19 किमीचे अंतर 13.3 किमी इतके कमी होणार आहे.
सध्या स्थितीला या प्रकल्पाचे 90% एवढे काम पूर्ण झाले असून लवकरच याचे उर्वरित काम पूर्ण होणार आहे. मार्च 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित आहे. खरंतर डिसेंबर 2024 ही या प्रकल्पाची शेवटची डेडलाईन होती.
मात्र मध्यंतरी या प्रकल्पासाठी मुदत वाढवण्यात आली आहे. यानुसार आता पुढल्या महिन्याच्या सुरुवातीला या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि हा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी खुला होईल अशी आशा आहे.