Mumbai-Pune Expressway : मुंबई, पुणे आणि नाशिक हे तीन शहरे महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण. या तिन्ही शहरांच्या विकासावरूनच खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राचा विकास मोजला जातो हे काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र या तिन्ही शहरादरम्यानची कनेक्टिव्हिटी आजही किचकट आहे. मुंबई ते पुणे, मुंबई ते नाशिक, नाशिक ते पुणे दरम्यानचा प्रवास आजही आव्हानात्मक आहे.
या तिन्ही शहरा दरम्यान प्रवास करताना प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसतोय. मुंबई ते पुणे यादरम्यानचा प्रवासही मोठा आव्हानात्मक झाला आहे. या मार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अपघातांची भीती देखील वाढली आहे.
खरे तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी आहे. पुण्याला राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणतात. मात्र या दोन्ही राजधानींच्या शहरादरम्यान प्रवास करताना सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.
वाहतूक कोंडीमुळे तासनतास प्रवाशांचा खोळंबा होतोय. दररोज मुंबई ते पुणे दरम्यान हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. मात्र भविष्यात या प्रवाशांचा प्रवास सोयीचा होणार आहे. कारण की मुंबई ते पुणे दरम्यानच्या मार्गावर एक महाकाय बोगदा तयार केला जाणार आहे.
यामुळे प्रवाशांचा 30 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प तयार केला जात आहे. या प्रकल्पा अंतर्गत मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटात 13.3 किलोमीटर लांबीचा नवीन मार्ग तयार होत आहे.
या प्रकल्पाला मिसिंग लिंक असे नाव देण्यात आले आहे. मिसिंग लिंक वर 1.75 किलोमीटर आणि 8.93 किलोमीटरचे दोन बोगदे अन केबल स्टेड पूल विकसित केले जात आहेत. यातील बोगद्यांचे काम हे आता अंतिम टप्प्यात आले आहे.
तसेच केबल स्टेड पुलाचे काम हे युद्ध पातळीवर सुरू आहे. आगामी काळात हे काम पूर्ण होईल आणि यामुळे पुणे ते मुंबई दरम्यानचा प्रवास सोयीचा होणार अशी आशा व्यक्त होत आहे.
या मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत जो बोगदा तयार केला जात आहे तो राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे. सध्या समृद्धी महामार्गावर तयार झालेला कसारा घाटातील आठ किलोमीटर लांबीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा म्हणून ओळखला जातोय.
मात्र येत्या काही महिन्यात जेव्हा मिसिंग लिंक प्रोजेक्ट हा वाहतुकीसाठी सुरू होईल तेव्हा या प्रकल्पा अंतर्गत खंडाळा घाटात तयार होणारा हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे या दरम्यानचा प्रवास 1/2 तासाने लवकर होणार आहे. यामुळे प्रवाशांचा इंधनाचा खर्च आणि बहुमूल्य वेळ वाचणार आहे.