Mumbai Pune Railway News : महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. रस्ते मार्गाने आणि रेल्वे मार्गाने भारतात सर्वाधिक प्रवास होत असतो. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच याची कनेक्टिव्हिटी देशातील सर्वच भागात उपलब्ध असल्याने रेल्वेने प्रवास करण्याला सर्वजण प्राधान्य दाखवतात. मुंबई ते पुणे दरम्यान ही रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहेत.
सणासुदीच्या काळात तर ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. दरम्यान भविष्यात मुंबई ते पुणे दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. आगामी काळात या दोन्ही शहरा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास तब्बल एक तास लवकर होणार आहे.
यासाठी मध्य रेल्वेने एक महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत हे दोन नवे मार्ग तयार करण्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे.
या प्रस्तावाला जर मंजुरी मिळाली तर भविष्यात मुंबई ते पुणे हा रेल्वे प्रवास 60 मिनिटे लवकर होणार आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे कोणत्याही मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना लोणावळा घाटातून न जाता थेट पुण्याला पोहोचता येणार आहे. एवढेच नाही तर या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे गाड्यांचा वेग सुद्धा वाढणार आहे.
या प्रस्तावित प्रकल्पामुळे या मार्गावर चालवल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या सुद्धा वाढणार आहे. म्हणजेच या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आगामी काळात सुसाट होणार आहे. या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास कमी वेळेत तर होणारच आहे शिवाय अधिक च्या गाड्या उपलब्ध होणार असल्याने याचा दोन्ही शहरातील नागरिकांना फायदा होणार आहे.
जर समजा सध्याच्या रेल्वे मार्गाने मुंबई ते पुणे हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन तास लागत असतील तर प्रस्तावित रेल्वे मार्गाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना फक्त दोन तास खर्च करावे लागणार आहेत. सध्याच्या रेल्वे मार्गाने जर प्रवास केला तर लोणावळा खंडाळा घाटातून जावे लागते.
पण या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे रेल्वे गाड्या लोणावळा घाटातून न जाता थेट मुंबई किंवा पुण्याला पोहोचणार आहेत. प्रवासी सुरक्षितता लक्षात घेऊन सध्याच्या रेल्वे मार्गाने लोणावळा घाटात रेल्वे गाड्यांचा वेग हा 60 किलोमीटर पर्यंत कमी केला जातो.
मात्र नवीन मार्ग तयार झाल्यानंतर गाड्या लोणावळा घाटात जाणार नसल्याने गाड्यांचा वेग हा कमी होणार नाही आणि संपूर्ण प्रवास हा 110 किलोमीटर प्रतितास या वेगाने पूर्ण करता येणार आहे. साहजिकच, यामुळे प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचणार आहे.
या नव्या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांचा तब्बल एक तासांचा कालावधी वाचणार असून यामुळे रेल्वेच्या खर्चातही बचत होणार आहे. पण, कर्जत ते तळेगाव या नव्या मार्गासाठी १६ हजार कोटी आणि कर्जत ते कामशेत या मार्गासाठी १०,२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.
म्हणजेच हा प्रकल्प खूपच महागडा आहे. पण, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या मार्गाने प्रवास करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण झाला पाहिजे अशी भावना सर्वसामान्यांमध्ये आहे.