Mumbai-Pune Railway : मुंबई, पुणे आणि नाशिक या तीन शहरांना महाराष्ट्राचा सुवर्ण त्रिकोण म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या विकासात या तिन्ही शहरांचा मोठा मोलाचा वाटा आहे. तसेच देशाच्या विकासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या इकॉनोमी मध्ये महाराष्ट्राच्या इकॉनॉमीचा एक मोठा समभाग आपल्याला पाहायला मिळतो.
पण, कोणत्याही राष्ट्राचा आणि राज्याचा विकास तेथील दळणवळण व्यवस्थेवर अवलंबून असतो. यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यातील दळणवळण व्यवस्था आणखी मजबूत बनवली जात आहे.
यासाठी वेगवेगळे रेल्वे मार्ग देखील तयार केले जात आहेत. नजीकच्या काळात मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास सुपरफास्ट व्हावा यासाठी नवीन रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा प्रवास जलद होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी पुण्याला जोडण्यासाठी कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत असे दोन नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.
सध्या मुंबईहून पुण्याला रेल्वेने जायचे असेल तर लोणावळा घाटातून जावे लागते. पर्वतरांगांना वळसा घालून प्रवास करावा लागतो. यामुळे मात्र सध्याच्या रेल्वे मार्गाची लांबी ही अधिक झाली आहे. तसेच सध्याच्या मार्गाने लोणावळा घाटात रेल्वेचा वेग हा कमी होतो.
पण या प्रस्तावित मार्गामुळे लोणावळा घाट बायपास होणार आहे. म्हणजे लोणावळा घाटात न जाता मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना पुणे गाठता येणार आहे. या नवीन प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे मुंबई आणि पुणे दरम्यान चा प्रवासाचा कालावधी चक्क 30 मिनिटांनी कमी होणार आहे.
म्हणजे जर मुंबईवरून पुण्याला जाण्यासाठी सध्याच्या मार्गाने तीन तासांचा वेळ लागत असेल तर या नव्याने प्रस्तावित मार्गामुळे हा प्रवासाचा वेळ अडीच तासांवर येणार आहे. कारण की, नव्याने प्रस्तावित मार्गावर रेल्वे गाडी 110 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावण्यासं सक्षम राहणार आहे.
सध्याचा मार्ग हा घाट सेक्शन मधून जातो आणि यामुळे या घाट सेक्शन मध्ये रेल्वे फक्त 60 किलोमीटर प्रतितास या वेगाने चालवली जाते. पण नव्याने प्रस्तावित रेल्वे मार्ग घाट सेक्शन टाळणार असल्याने या मार्गावर रेल्वे ११० किलोमीटर प्रतितास या वेगाने चालवली जाणार आहे.
कर्जत ते तळेगाव आणि कर्जत ते कामशेत या दोन मार्गांचा प्रस्ताव रेडी करण्यात आला आहे. जर या दोनपैकी एक मार्ग मंजूर झाला तर ४ वर्षांत काम पूर्ण केले जाणार आहे.