Mumbai Railway News : मुंबईमधील अन कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईहून गोव्यासाठी आणखी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात वास्तव्यास असणाऱ्या कोकणातील जनतेला या गाडीचा सर्वाधिक फायदा होणार आहे.
मुंबईमध्ये कोकणातील नागरिक मोठ्या प्रमाणात स्थाईक आहेत. यामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या खूप मोठी आहे. तथापि मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या नागरिकांना कोकणात जायचे असल्यास रेल्वे गाडी पकडण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते.
पण, आता पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनस येथून कोकणासाठी नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय झाला आहे. वांद्रे टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान २० एलएचबी कोचं असणारी गाडी चालवली जाणार आहे.
काल अर्थातच 27 ऑगस्ट 2024 ला रेल्वे बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी कोकण रेल्वे मंडळाने वांद्रे टर्मिनस ते मडगाव दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेनबाबतचा प्रस्ताव पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे आणि रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला होता.
दरम्यान, बोर्डाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असल्याने आता लवकरच ही गाडी सुरू केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाने या गाडीचे वेळापत्रक कसे राहील आणि या गाडीला कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे याबाबतची सविस्तर माहिती एका परिपत्रकातून निर्गमित केली आहे.
कसे राहील वेळापत्रक ?
गाडी क्रमांक 10115 बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी ६.५० वाजता वांद्रे येथून सुटणार आहे अन मडगाव येथे रात्री १० वाजता पोहोचणार आहे.
तसेच गाडी क्रमांक 10116 मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सोडली जाईल अन वांद्रे टर्मिनस येथे रात्री ११.४० वाजता पोहोचणार आहे. या नव्याने सुरू होणाऱ्या गाडीमुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.
कुठे कुठे मिळालाय थांबा
या नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वेगाडीला बोरिवली, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, वीर, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, थिवी, करमळी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.