स्पेशल

अखेर मुहूर्त सापडला ! आता ‘या’ दिवशी मुंबई-शिर्डीनगर आणि मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचं होणार उद्घाटन ; नरेंद्र मोदी दाखवणार हिरवा झेंडा, पहा डिटेल्स

Mumbai-Shirdi Vande Bharat Express : येत्या फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मायानगरी मुंबई मध्ये आगमन होणार आहे. राजधानी मुंबईमधला मोदींचा हा दौरा विशेष राहणार आहे. कारण की, या दौऱ्यात पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते एकूण दोन वंदे भारत एक्सप्रेसच उद्घाटन आयोजित करण्यात आला आहे.

यामुळे महाराष्ट्रातील जनतेच या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागून आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 10 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. खरं पाहता या दौऱ्यात मोदी एका समुदायाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. यासोबतचं ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल या ठिकाणी 15 मिनिटाच्या कार्यक्रमासाठी हजर राहणार आहेत.

या पंधरा मिनिटांच्या कार्यक्रमात एकूण दोन वंदे भारत एक्सप्रेसला त्यांच्याकडून हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. या दोन वंदे भारत एक्सप्रेस मध्ये मुंबई सोलापूर आणि सीएसएमटी-साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे. निश्चितच या दोन वंदे भारत एक्सप्रेसमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे.

सीएसएमटी-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस विषयी

खरं पाहता या वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात नरेंद्र मोदी यांच्या गेल्या मुंबई दौऱ्यावरच होणार होती. 19 जानेवारीला मोदी मुंबईला आले असताना या वंदे भारत एक्सप्रेसचे उद्घाटन होणार असल्याचे सांगितले गेले होते. मात्र काही अडचणींमुळे रेल्वेला या वंदे भारत एक्सप्रेसच त्यावेळी उद्घाटन करता आलं नाही. दरम्यान आता 10 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर असताना या वंदेभारत एक्सप्रेसच उद्घाटन केलं जाणार आहे. या वंदे भारत एक्सप्रेस मुळे मुंबई ते सोलापूर हे अंतर साडेसहा तासांमध्ये पूर्ण होणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की सध्या मुंबई ते सोलापूर हा प्रवास करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सिद्धेश्वर एक्सप्रेस ला आठ तासांचा कालावधी लागतो. निश्चितच या वंदे भारत एक्सप्रेसमुळे आठ तासांचा हा कालावधी साडे सहा तासात पूर्ण होणार असल्याने प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान या वंदे भारत एक्सप्रेसच्या टाईम टेबल बद्दल जर बोलायचे झाले तर, सोलापूर येथून सकाळी 06:05 मिनिटांनी ही रेल्वे सुटेल 9 वाजता पुणे येथे पोहचेल आणि दुपारी 12:35 वाजता सीएसएमटीला म्हणजे मुंबईला पोहोचणार आहे.

दरम्यान या रेल्वेच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर त्याच दिवशी सायंकाळी ही रेल्वे मुंबईहून सोलापूरच्या दिशेने निघेल. सायंकाळी 4 वाजून 10 मिनिटांनी मुंबईहून निघाल्यानंतर सात वाजून 30 मिनिटांनी ही रेल्वे पुण्यात दाखल होईल अन मग रात्री दहा वाजून 40 मिनिटांनी ही रेल्वे सोलापूरला पोहोचेल. दरम्यान मुंबईहून बुधवारी आणि सोलापूरहून गुरुवारी ही रेल्वे धावणार नाही. ही रेल्वे दादर, ठाणे, लोणावळा, पुणे, कुर्डुवाडीला थांबा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सीएसएमटी-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस विषयी थोडक्यात

सीएसएमटी ते शिर्डी दरम्यान धावणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस मधून मुंबई ते शिर्डी हा प्रवास पाच तास 55 मिनिटात पूर्ण करता येणे शक्य होणार आहे. या वंदे भारतच्या टाईम टेबल बद्दल बोलायचं झालं तर ही रेल्वे सीएसएमटीतून सायंकाळी 6:15 वाजता निघणार आहे आणि रात्री 12:10 मिनिटांनी शिर्डी या गंतव्यस्थळी पोहोचणार आहे. या रेल्वेचे दादर, ठाणे, नाशिक रोडला थांबे राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी मात्र ही वंदे भारत एक्सप्रेस धावणार नाही. हफ्त्यातील इतर सहा दिवस ही रेल्वे अविरतपणे सुरू राहणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts