Mumbai Vande Bharat Sleeper Train : गेल्या दहा वर्षांच्या काळात भारतीय रेल्वेने कात टाकली आहे. रेल्वेने गेल्या एका दशकात अशी नेत्रदीपक प्रगती साधली आहे की जगातील अनेक प्रगत देशांना देखील मागे टाकले आहे. विशेषता रेल्वेच्या ताफ्यात जेव्हापासून वंदे भारत एक्सप्रेस डेरेदाखल झाली आहे तेव्हापासून रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे.
वंदे भारत एक्सप्रेस सर्वप्रथम 2019 मध्ये रुळावर धावली होती. तेव्हापासून आजतागायत देशातील 52 महत्त्वाच्या मार्गांवर ही हायस्पीड ट्रेन सुरु झाली आहे. विशेष म्हणजे भविष्यात वंदे भारत एक्सप्रेसचे जाळे आणखी वाढणार आहे.
दुसरीकडे रेल्वेने आता वंदे भारत स्लीपर ट्रेन देखील सुरू करण्याचा इरादा जाहीर केला आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या काही दिवसांनी लॉन्च होणार अशी खात्रीलायक बातमी समोर आली आहे. दरम्यान आता याच गाडी संदर्भात एक मोठी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला वंदे भारत स्लीपर ट्रेन मिळणार आहे. ही ट्रेन मुंबई ते मुरादाबाद दरम्यान चालवली जाणार आहे.
खरे तर गेल्या पाच दशकांपासून म्हणजेच 50 वर्षांपासून मुरादाबादहून मुंबईला थेट रेल्वे चालवावी, अशी मागणी नागरिकांच्या माध्यमातून केली जात आहे. मुरादाबादच्या जनतेने यासाठी रेल्वे कडे सातत्याने पाठपुरावा देखील केला आहे.
मात्र गेल्या पाच दशकात ही मागणी काही पूर्ण झाली नाही. पण, आता ही मागणी पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या मार्गावर चक्क वंदे भारत स्लीपर ट्रेन चालवली जाणार आहे.
यामुळे मुंबई ते मुरादाबाद हा प्रवास जलद आणि अतिशय आरामदायी होणार आहे. मुरादाबादच्या जनतेला आता आरामदायी, जलद आणि सुरक्षित प्रवास अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे मुंबई आणि मुरादाबाद मधील हजारो नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे.
मात्र ही गाडी मुरादाबाद ते मुंबई अशी थेट धावणार नसून बरेली ते मुंबई दरम्यान प्रस्तावित करण्यात आलेली स्लीपर वंदे भारत ट्रेन मुरादाबाद-हापूर-गाझियाबाद-निजामुद्दीन मार्गे धावणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ट्रेनचे वेळापत्रक हे समितीसमोर ठेवण्यात आले आहे.
याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर या मार्गावर प्रत्यक्षात वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे मुंबई ते बरेली यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मोठा फायदा होणार आहे.
प्रवाशांचा बहुमूल्य वेळ तर वाचणारच आहे शिवाय सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देखील प्रवाशांना घेता येणार आहे. तथापि ही गाडी कधीपर्यंत सुरू होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.