Narendra Modi : देशात पुढल्यावर्षी लोकसभा निवडणुका राहणार आहेत. तसेच या चालू वर्षी कर्नाटकसहित अनेक राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. तसेच पुढच्या वर्षी महाराष्ट्रात देखील विधानसभा निवडणुका सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक, महाराष्ट्रासह देशभरात विविध विकासाची प्रकल्प पूर्ण केली जात आहेत. तसेच ज्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत त्यांना गती देण्याचे काम सध्या स्थितीला सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्ते विकासाची कामे जलद गतीने पूर्ण केली जात आहेत.
नुकतेच दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पीएम मोदी यांनी केले आहे. या समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई डिसेंबर 2023 अखेर पूर्ण होणार असून हा महामार्ग यावर्षीच खुला करण्याचा शासनाचा मानस आहे. अशातच आता कर्नाटक राज्यासाठी अतिमहत्त्वाच्या अशा बंगलोर-म्हैसूर महामार्गाचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
हा मार्ग एकूण 118 किलोमीटर लांबीचा असून यामुळे या दोन शहरांदरम्यान मात्र 75 मिनिटात प्रवास करता येणे शक्य होणार आहे. सध्यास्थितीला मैसूर ते बेंगलोर हे अंतर पार करण्यासाठी तीन तासांचा कालावधी लागत आहे. निश्चितच यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून या दोन शहरांमधील कनेक्टिव्हिटी अजूनच सुधारणार आहे. या प्रकल्पासाठी जवळपास 8480 कोटी रुपयांचा खर्च झाला असून हा प्रकल्प एकूण दोन टप्प्यात बांधण्यात आला आहे.
या प्रकल्पांतर्गत 52 किलोमीटर लांबीचे पाच बायपास देखील तयार केले गेले आहेत. या एक्सप्रेस वे मुळे कर्नाटक मधील कृषी, उद्योग, पर्यटन इत्यादी क्षेत्राला मोठा हातभार लागणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचे उद्घाटन करणार असून त्यांनी या प्रकल्पाला अतिशय महत्त्वाचा कनेक्टिव्हिटी प्रकल्प म्हणून संबोधले आहे.
कर्नाटकच्या दृष्टीने अति महत्त्वाचा असा हा प्रोजेक्ट असून या एक्सप्रेस वेमध्ये 4 रेल्वे ओव्हरब्रिज, 9 महत्त्वाचे पूल, 40 छोटे पूल आणि 89 अंडरपास आणि ओव्हरपास यांचा समावेश आहे. एवढेच नाही तर या महामार्गात राष्ट्रीय महामार्ग-275 चा एक भागही समाविष्ट आहे. आता या प्रकल्पाचे उद्घाटन उद्या होणार असून सर्वसामान्यांसाठी प्रकल्प खुला होईल. यामुळे आता श्रीरंगपटनम, कूर्ग, उटी आणि केरळ यासारख्या भागात पोहोचण्यासाठी प्रवाशांना मोठे सोयीचे होणार आहे.