Navi Mumbai Cidco Lottery : म्हाडा मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली. यासाठी लाखो लोकांनी अर्ज सादर केले आहेत. म्हाडा पाठोपाठ आता सिडकोने देखील 40,000 घरांसाठी लॉटरी काढण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खरे तर मुंबई, नवी मुंबई सारख्या शहरांमध्ये घर असणं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. देशाच्या राष्ट्रीय राजधानीत आणि महाराष्ट्राच्या राज्य राजधानीत घर असावे असे स्वप्न कित्येकांनी आपल्या उराशी बाळगले आहे.
मात्र साऱ्यांचेचं हे स्वप्न पूर्ण होते असे नाही. या महानगरांमध्ये दिवसेंदिवस घरांच्या किमती वाढत असून कोट्यावधी रुपयांचे घर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले आहे. अशा या अडचणीच्या काळात मात्र म्हाडा आणि सिडकोच्या घरांचा मोठा आधार सर्वसामान्यांना मिळतोय.
दरम्यान, आता सिडकोकडून लवकरच 40000 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. सिडको नवी मुंबईतील विविध भागांमधील हजारो घरांसाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर लॉटरी काढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील विविध नोडमध्ये तसेच रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या तब्बल ४० हजार घरांची लॉटरी निघणार आहे.
ही घरे वाशी, सानपाडा, जुईनगर, खांदेश्वर आणि नेरूळ या रेल्वे स्थानकांजवळ राहणार आहेत. यामुळे जर तुम्हालाही नवी मुंबईत स्वतःचे, हक्काचे घर हवे असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला आत्तापासूनच पैशांची जमवाजमव करावी लागणार आहे.
सिडकोच्या या लॉटरीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ग्राहकांना कोणत्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाचे घर पाहिजे हे निवडण्याची खास मुभा सुद्धा देण्यात आली आहे. अशातच सिडको प्राधिकरणाच्या आगामी सोडतीसंदर्भात एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, ज्याप्रमाणे म्हाडा मुंबई मंडळाने मुंबई मधील घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे अगदी त्याच धर्तीवर सिडको प्राधिकरण देखील नवी मुंबई मधील आपल्या हजारो घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकते. सिडको प्राधिकरण नवी मुंबई मधील घरांच्या किमती जवळपास दहा टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता आहे.
असे झाल्यास नवी मुंबईत हक्काच्या घराचे स्वप्न साकार करू इच्छिणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. खरंतर म्हाडा मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती त्यावेळी त्यांच्या किमतीमुळे लॉटरीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.
मात्र जेव्हा मुंबई मंडळाने घराच्या किमती कमी केल्या तेव्हा या घरांसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढली. यामुळे आता सिडको देखील आगामी सोडती मध्ये समाविष्ट होणाऱ्या घरांच्या किमती 10 टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता काही मीडिया रिपोर्ट मध्ये वर्तवली जात आहे.