स्पेशल

Neo Metro : प्रतीक्षा संपली ! महाराष्ट्रातील ‘या’ निओ मेट्रोच्या प्रकल्पाला दिल्ली दरबारी आज मंजुरी?

Neo Metro : दिल्लीहून महाराष्ट्राला लवकरच एक मोठी गुड न्यूज मिळणार आहे. खरं पाहता गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील दोन ते तीन महिन्यात निओ मेट्रोचा प्रकल्प नाशिक मध्ये सुरू होईल अशी घोषणा केली होती. यानंतर नाशिककरांसमवेतच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फडणवीस यांनी ही घोषणा केल्यानंतर लगेचच दिल्ली दरबारी संबंधित अधिकाऱ्यांना या प्रकल्पासंदर्भात पाचारण करण्यात आले. याच प्रकल्पासंदर्भात आज राजधानी दिल्ली येथे एका बैठकीच्या माध्यमातून मंथन होणार आहे. यामुळे नाशिककरांचे या बैठकीकडे लक्ष लागून राहणार आहे. दरम्यान या बैठकीत नाशिक मधील निओ मेट्रो प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये नासिक येथे मेट्रो सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे यानंतर या प्रकल्पासाठी आवश्यक सर्वेक्षण देखील करण्यात आले. सर्वेक्षणाची जबाबदारी ही सिडको आणि महा मेट्रोला देण्यात आली. या अनुषंगाने महा मेट्रो ने शहरात सर्वेक्षण केले. मात्र सर्वेक्षणानंतर नाशिक शहरात पुरेशी प्रवाशांची संख्या उपलब्ध नसल्याने मेट्रो सुरु करता येणार नसल्याचे सांगितले गेले.

मात्र मेट्रो सुरु करता येणार नसले तरी शहरात टायर बेस मेट्रोची संकल्पना उभारली जाऊ शकते अशी देखील सूचना महा मेट्रो ने दिली. महा मेट्रो ने केलेल्या या शिफारशीनुसार लगेचच टायरबेस मेट्रोच्या सर्वेक्षणासाठी दिल्लीच्या एका कंपनीला काम देण्यात आले. राईटस कंपनीला हे काम देण्यात आले आणि या कंपनीने सर्वेक्षण देखील पूर्ण केले. यानंतर मग या टायर बेस निओ मेट्रो प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत मान्यता देण्यात आली. यानंतर हा प्रस्ताव दिल्ली दरबारी पाठवण्यात आला.

विशेष बाब म्हणजे या प्रकल्पासाठी तातडीने 2020 मध्ये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली. 2092 कोटी रुपयांची तरतूद या प्रकल्पासाठी झाली. तसेच हा प्रकल्प 2023 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असं देखील नमूद केलं गेलं. मात्र निओ मेट्रोच्या या प्रकल्पासाठी आता 2023 उलटून चालले तरी देखील नारळ फुटला नसल्याचे चित्र आहे. यामुळे हा प्रकल्प नेमका केव्हा सुरू होईल असा प्रश्न नाशिककरांनी उपस्थित केला.

अशातच नासिक येथे भाजपाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाचा नारळ नेमका केव्हा फुटेल याबाबत स्पष्टीकरण दिले. उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे आयोजित भाजपा कार्यकारणीच्या बैठकीत निओ मेट्रो प्रकल्प येत्या तीन महिन्यात सुरू होईल असं सांगितलं. विशेष म्हणजे हा निओ मेट्रोचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडला असून आता देशात केवळ दोनच मेट्रो राहतील आणि यामध्ये नासिक येथे सुरू होणाऱ्या टायर बेस मेट्रोचा समावेश असेल असं त्यांनी म्हटलं.

आता पारंपारिक मेट्रो ज्या शहरात धावू शकत नाही अशा शहरात नाशिक प्रमाणे मेट्रो सुरु करण्याचं केंद्र शासनाने ठरवलं असून त्या अनुषंगाने प्रस्ताव मागितले आहेत. संपूर्ण देशभरातून हे प्रस्ताव केंद्राकडे येत आहेत. यामुळे नासिक मधील निओ मेट्रोचा प्रश्न लांबनीवर पडल्याचे फडणवीस यांनी सांगितले. संपूर्ण देशभरासाठी एकच प्रस्ताव निओ मेट्रोसाठी सादर करा असं केंद्र शासनाने सांगितलं असल्याने या प्रकल्पाला उशीर होत असल्याचे त्यांनी नुकत्याच दोन ते तीन दिवसांपूर्वी नाशिक येथे म्हटलं. फडणवीस यांनी हे भाष्य केलं आणि तिकडे दिल्ली दरबारी या प्रकल्पासाठी हालचाली तेज झाल्या.

दिल्ली दरबारी नगर विकास मंत्रालयाकडून या प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी तातडीने बैठक देखील आज बोलवण्यात आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. विशेष बाब अशी की या बैठकीसाठी नाशिकचे महापालिका आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. महापालिका आयुक्त या बैठकीत प्रकल्पाचा खर्च वाढवण्यावर चर्चा घडवून आणणार असल्याचे देखील एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. निश्चितच आज होणाऱ्या या बैठकीत निओ मेट्रोबाबत काही निर्णय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहणार आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts