स्पेशल

निलेश लंके हे नगर दक्षिण मधून तुतारी फुंकणारच, कारण आता…..

Nilesh Lanke News : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रात मात्र महायुतीमधील आणि महाविकास आघाडी मधील जागा वाटपावरून गोंधळ निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही पूर्णपणे मिटलेला नाही. भारतीय जनता पक्षाने मात्र राज्यातील आपल्या वीस उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बीजेपीने नगर दक्षिण मधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना संधी दिली आहे.

दुसरीकडे भाजपाने विखे यांना दुसऱ्यांदा संधी दिल्यानंतर या जागेवरून पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याची इच्छा मनाशी बाळगून असलेले महायुतीतले निलेश लंके हे लवकरच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे खूपच चर्चेत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत निलेश लंके यांची चर्चा पाहायला मिळत आहे. नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि अजितदादा यांनी वेगळी भूमिका घेत सरकारमध्ये समाविष्ट होण्याचा निर्णय घेतला.

तेव्हा अजितदादा यांच्या समवेत निलेश लंके यांनी देखील सरकारमध्ये जाण्याचे ठरवले.

आता मात्र अजितदादा यांच्या गटाला लंके लवकरच सोडचिट्टी देणार असे संकेत मिळतं आहेत. लंके यांनी मोठ्या साहेबांची अर्थातच शरद पवार यांची पुण्यात नुकतीच भेट घेतली होती. खरेतर तेव्हाच ते शरद पवार यांच्या गटात प्रवेश करतील अशा चर्चा होत्या. मात्र सुप्रिमो शरद पवार तथा लंके यांनी यासंदर्भात सध्या मौन बाळगले आहे.

पण, जेव्हापासून मोठ्या साहेबांची भेट घडली आहे तेव्हापासून लंके यांचे सूर आणि ताल बदलले आहेत. सोशल मीडियावर घड्याळाचा वापर कमी झाला आहे आणि तुतारीचा वापर तथा मोठ्या साहेबांचा फोटो त्यांच्या बॅनरवर अधिक झळकू लागला आहे. मोठ्या साहेबांची भेट घेतल्यानंतर लंके यांनी तुळजापुरला जाऊन तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

यावेळी रस्त्यात त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठया साहेबांचा फोटो, तुतारीचा फोटो, तसेच निलेश लंके आणि त्यांच्या पत्नीचा एकत्रित फोटो अशा आशयाचे बॅनर लावले होते. या बॅनरवर वस्तादाचा पहिला डाव असा मजकूरही होता. तसेच आता आमदार लंके यांनी सोशल मीडियावर ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर कमी केल्याचे पाहायला मिळतं आहे.पण, ‘एक्स’ खात्यावरील त्यांचा डीपी हा स्वतःचा आहे आणि त्यावर ‘घड्याळ’ हे चिन्ह स्पष्टपणे दिसते.

मात्र आधी ते रोज खात्यावर जे पोस्ट करत त्या फोटोच्या स्ट्रीपमध्ये नावासह ‘घड्याळ’ चिन्ह वापरत असत. आता मात्र त्यांची ही सवय मोडली गेली आहे. राजकारणात अशी सवय अचानक मोडत नाही. सवय सोडण्यामागे देखील काहीतरी कारण असते.

त्यांनी आपल्या एक्स टाईमलाईनवरील गेल्या दोन पोस्टमध्ये ‘घड्याळ’ हे चिन्ह वापरलेले नाहिये.

आधी प्रत्येक पोस्टमध्ये घड्याळ हे चिन्ह दिसत आता मात्र डीपीवरच घड्याळाचे चिन्ह आहे. यामुळे डीपीवरील घड्याळ हे देखील कदाचित मोठ्या साहेबांचे आदेश मिळाले अन पक्षप्रवेशाची औपचारिक घोषणा पूर्ण झाली की बदलनार असे दिसत आहे. त्यांच्या या हालचाली त्यांचा ओघ मोठ्या साहेबांकडे असल्याचे स्पष्ट करत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतच एक मोठे भाष्य केलं आहे.

त्यांनी असे म्हटले आहे की, ‘लंके हे एक लोकप्रिय नेते आहेत. ते निवडणुकीत उभे राहिले तर शंभर टक्के जिंकतील. पण, ते तुतारी हातात घेतील की नाही, यावर मी भाष्य करणार नाही. तसे करून त्यांना अडचणीत आणणार नाही. परंतु यावेळी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात विजयाची तुतारी वाजणारच आहे. आम्ही नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ जिंकल्याशिवाय गप्प बसणार नाही.

निलेश लंके यांच्याबाबतीत योग्य वेळी सोपस्कार पूर्ण होईल.’ असे म्हणत लंके हे लवकरच शरद पवार यांच्या गटात जाऊ शकतात असे संकेत दिले आहेत. मात्र उघड-उघड याबाबत बोलणे टाळले आहे. परंतु या साऱ्या घडामोडी पाहता राजकीय वर्तुळात निलेश लंके हे नगर दक्षिण मधून तुतारी फुकणार आणि सुजय विखे पाटील यांना आव्हान देणार अशा चर्चा पाहायला मिळत आहेत.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts