स्पेशल

6 महिन्यांपूर्वी ज्या ईव्हीएमने निलेश लंके यांना खासदार बनवले त्यांच EVM मशीनवर आता लंकेना संशय येतोय, खा. म्हणतात….

Nilesh Lanke News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता जवळपास सात दिवस पूर्ण झालेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला आहे. महायुतीमध्ये समाविष्ट भारतीय जनता पक्ष, शिवसेना एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला यावेळी तब्बल 232 जागा मिळाल्या आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडी अर्धशतक देखील पूर्ण करू शकले नाही.

यामुळे, मात्र महाविकास आघाडीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. महाविकास आघाडीमधील अनेक नेत्यांनी या निकालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असल्याने महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ईव्हीएम मशीनमध्ये काहीतरी गडबड असल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीतील अनेक पराभूत नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे फेर मतमोजणीसाठी अर्ज दाखल केले आहेत. अहिल्यानगर जिल्हा बाबत बोलायचं झालं तर जिल्ह्यातील राहुरी मतदार संघातील पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे, पारनेर मतदार संघातील पराभूत उमेदवार राणी लंके, कोपरगाव मतदार संघातील पराभूत उमेदवार संदीप वर्पे अशा अनेकांनी फेरमतमोजणीसाठी अर्ज सादर केले असून यासाठी लाखो रुपयांचे शुल्क देखील भरले आहे.

अशातच, आता गेल्या सहा महिन्यांपूर्वी याच ईव्हीएम मशीनवर झालेल्या निवडणुकीतून खासदार झालेले नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी देखील ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. खरे तर, ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांनी ईव्हीएम विरोधात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले होते.

यावेळी बाबा आढाव यांच्या भेटीसाठी राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते आणि महायुतीमधील अजित पवार हे त्यांच्या भेटीसाठी गेलेत. दरम्यान, याच आंदोलनाचा दाखला देत खासदार निलेश लंके यांनी असे म्हटले आहे की, ‘अनेक मतदारसंघात झालेली मतदानाची आकडेवारी आणि प्रत्यक्षरित्या ईव्हीएमवर जी आकडेवारी आहे, त्यात तफावत पाहायला मिळाली.

काही ठिकाणी तर विरोधकांचे बुथही नव्हते किंवा कोणी पोलिंग एजंट नव्हता. त्या ठिकाणीही मताधिक्य मिळालेले आहे. हे सगळे शंकास्पद आहे. त्यामुळेच बाबा आढाव हे ९५ वर्षांचे असूनही त्यांनी पुण्यात आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे. तसेच अनेक ठिकाणी लोक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पुढे बोलताना खासदार लंके यांनी, काही तज्ज्ञ लोक आहेत.

त्यांनी खूप धक्कादायक माहिती दिली आहे. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मशीन बनवणाऱ्या कंपनीला हे काम दिले, त्या कंपनीवरील पदाधिकारी भाजपाशी संबंधित आहेत. तीनपैकी एक संचालक भाजपाचा गुजरातमधील माजी जिल्हाध्यक्ष आहे. एक बिहारमधील कुठला तरी होता. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात. अशा काही गोष्टी आता येत आहेत.

आम्हाला जिथे हजाराचे मताधिक्य मिळणे अपेक्षित होते, तिथे फक्त १०० ते १५० चे मताधिक्य मिळाले आहे, त्यामुळे हे सगळे शंकास्पद आहे. अनेकांनी सांगितले की, आम्ही मतदानच केले नाही, मग एवढे मतदान झालेच कसे? असे काही प्रश्न उपस्थित करत लंके यांनी EVM वर शँका व्यक्त केली. पण, याच ईव्हीएम मशीनचा वापर करून नुकत्याच सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिक यश मिळाले होते.

त्यावेळी महाविकास आघाडीने त्या यशाचा मोठा गाजावाजा केला होता. जसे महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले तसेच विधानसभा निवडणुकीत मिळणार असा विश्वास ते व्यक्त करत होते. मात्र, आता विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि या निकालात महाविकास आघाडीला जनतेने नाकारल्याचे दिसून आल्याने विरोधकांच्या माध्यमातून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात असल्याने सर्वसामान्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts