Nilesh Lanke News : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशभरात राजकीय वातावरण तापलेले आहे. नगरमध्ये तर दररोज काही ना काही नवीन राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात नगरच्या राजकारणावरून चर्चा सुरू आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत पारनेरचे आमदार निलेश लंके. खरेतर लंके हे अजितदादा यांच्या गटात आहेत.
पण, लवकरच ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा आहेत. आगामी निवडणुकीत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून लंके यांना निवडणूक लढवायची आहे आणि यासाठी ते शरद पवार यांच्या गटात जातील अशी शक्यता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नुकत्याच काही दिवसांपूर्वी पुण्यात लंके यांनी लिहिलेल्या एका पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. या पुस्तकाचे विमोचन शरद पवार यांच्या हस्ते झाले.
त्यावेळीच ते शरद पवार यांच्या गटात जातील अशा चर्चा होत्या. मात्र त्यावेळी पक्षप्रवेश झाल्याची अधिकृत घोषणा झाली नाही. परंतु, शरद पवार यांनी लंके यांचे स्वागत केले. विशेष म्हणजे लंके यांनी साहेब जो आदेश देतील तो मान्य असेल असे म्हटले. दुसरीकडे, लंके आपल्या कार्यकर्त्यांची आपण लोकसभा निवडणूक लढवावी अशी इच्छा असल्याचे म्हणतात.
त्यांच्या वाहनांवर आता शरद पवार यांच्या गटाचे निशानही झळकू लागले आहे. शरद पवार यांचा फोटोही ते आपल्या बॅनरवर वापरत आहेत. यामुळे निलेश लंके नेमक्या कोणत्या पक्षाचे ? यावरून सध्या नगरच्या राजकारणासहित संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरु आहे. फक्त राज्याच्या राजकारणातच नाही तर निलेश लंके हे नेमक्या कोणत्या पक्षाचे आहेत याबाबत दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात देखील चर्चा झाली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, शरद पवार आणि अजित दादा पवार यांच्या गटात पक्षाच्या चिन्हावरून वाद सुरू आहेत. निवडणुका आयोगाने अजितदादा यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे मूळ चिन्ह वापरण्यास परवानगी दिलेली आहे.
दुसरीकडे शरद पवार यांच्या गटाला हाती तुतारी पकडलेला माणूस हे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र या विरोधात शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. दरम्यान याच प्रकरणाची सुनावणी मंगळवारी अर्थातच 19 मार्च 2024 ला झाली.
या सुनावणीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी चिन्ह लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुकीत देखील वापरता येईल असे स्पष्ट केले.
दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने अजितदादा यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मूळ चिन्ह वापरण्यास सशर्त परवानगी दिली आहे.अजितदादा यांच्या गटाला घड्याळ हे चिन्ह वापरताना चिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावरचा निर्णय येईपर्यंतच हे चिन्ह वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पक्षाला दिली आहे, असे लिहिण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान मंगळवारी ही सुनावणी सुरू असतानाच शरद पवार गटाचे वकील एडवोकेट सिंघवी यांनी अजितदादा गटातील आमदार निलेश लंके हे शरद पवार यांचा फोटो वापरत असल्याचे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
यावर उत्तर देताना अजितदादा यांच्या गटाच्या वकिलांनी आमदार निलेश लंके हे आधीच शरद पवार यांच्या गटात सामील झाल्याचा मोठा दावा केला होता. मात्र शरद पवार गटाच्या वकिलांनी हा दावा अमान्य केला. निलेश लंके हे अजूनही अधिकृतरित्या अजितदादा यांच्या गटातच आहेत असे एडवोकेट सिंघवी यांनी यावेळी न्यायालयाला सांगितले.
एकंदरीत पारनेरचे आमदार निलेश लंके हे कोणत्या पक्षाचे आहेत ? यावरून फक्त नगरच्या राजकीय वर्तुळात किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चा होत आहे असे नाही तर ही चर्चा दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात देखील पाहायला मिळाली आहे. यामुळे, नगरच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा निलेश लंके यांची चर्चा रंगली असून लंके आपली भूमिका केव्हा क्लियर करणार ? याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे.