Nimboli Ark : गेल्या काही वर्षांपासून हवामानात होत असलेल्या विपरीत बदलामुळे जवळपास सर्वच हंगामातील पिकांवर किडींचे प्रमाण वाढले आहे. सोयाबीन, मका, तूर, कापूस यांसारख्या मुख्य पिकांवर कीटकांचे आणि रोगांचे प्रमाण वाढले असल्याने पीक उत्पादनात घट होत आहे.
विशेष बाब म्हणजे या कीटकांच्या नियंत्रणासाठी शेतकरी बांधव रासायनिक औषधांचा वापर करतात. रासायनिक औषधांमुळे जरी किड नियंत्रण लवकर होत असले तरीदेखील यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. अनेकदा रासायनिक औषधे फवारून देखील किडीवर नियंत्रण मिळवता येत नाही.
शिवाय रासायनिक औषधांचा वापर केल्यामुळे शेतमालाची गुणवत्ता ढासळते. परिणामी रासायनिक औषधांऐवजी शेतकऱ्यांनी कीड नियंत्रणासाठी जैविक औषधांचा वापर करावा असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी शेतकऱ्यांना दिला आहे. जैविक किड नियंत्रणामध्ये निंबोळी अर्काचा देखील वापर केला जातो.
असं सांगितलं जातं की निंबोळी अर्क फवारल्यामुळे पिकावर येणाऱ्या विविध कीटकांचे नियंत्रण सहजतेने शक्य होते. अशा परिस्थितीत आज आपण निंबोळी अर्क शेतकरी बांधव कशा पद्धतीने घरच्या घरी तयार करू शकतात या संदर्भात जाणून घेणार आहोत.
निंबोळी अर्क कोणत्या पिकावर फवारता येतो
कृषी तज्ञ सांगतात की निंबोळी अर्क जैविक किड नियंत्रणासाठी अतिशय फायदेशीर सिद्ध झाले आहे. निंबोळी अर्काचा खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, तूर या पिकावरील किड नियंत्रणासाठी वापर होतो. तसेच भाजीपाला पिके, फळपिकांवर येणाऱ्या किंडींच्या नियंत्रणासाठी देखील निंबोळीअर्क फवारला जाऊ शकतो.
विशेष म्हणजे या पिकांवर येणाऱ्या कीटकांचे निंबोळी अर्कांमुळे सहजतेने नियंत्रण मिळवता येते. रस शोषक किडींमध्ये मावा, फुलकिडे, पांढरी माशी, तुडतूडे, पिठ्या ढेकून, पतंगवर्गीय किडींमध्ये गुलाबी बोंडअळी, घाटेअळी, शेंडे व फळे पोखरणारी अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी अशा कीटकांच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क प्रभावी सिद्ध होत असल्याचा दावा काही तज्ञांनी केला आहे.
हे पण वाचा :- खुशखबर ! राज्यातील ‘या’ 1 लाख गरीब लोकांना मिळणार हक्काच घर; कोणत्या जिल्ह्यात किती लोकांना मिळणार लाभ? पहा….
निंबोळी अर्क बनवण्याची पद्धत
निंबोळी अर्क बनवण्यासाठी उन्हाळ्यात निंबोळ्या साठवून ठेवल्या पाहिजेत. तसेच ज्या दिवशी निंबोळी अर्कचा फवारा मारायचा असेल त्याच्या एक दिवस अगोदरच निंबोळी अर्क तयार करून घ्यावे लागते.
यासाठी निंबोळ्या कुटून बारीक कराव्यात, यामध्ये काडीकचरा घाण राहणार नाही याची काळजी घ्यावी.
हा कुटलेला निंबोळीचा चुरा पाच किलो घ्यायचा आहे. हा पाच किलो निंबोळी चुरा फवारणीच्या आदल्या दिवशी नऊ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवायचा आहे. तसेच एक लिटर पाण्यात २०० ग्रॅम साबणाचा चुरा देखील वेगळा भिजत ठेवायचा आहे. दोन्ही एकत्र भिजत ठेवायचे नाहीत वेगवेगळे भिजत ठेवायचे.
दुसऱ्या दिवशी म्हणजे मग फवारणीच्या दिवशी सकाळी पाण्यात भिजवत ठेवलेला निंबोळीचा अर्क पातळ कपड्यातून वस्त्रगाळ करून गाळून घ्यावा. मग या गाळलेल्या अर्कात एक लिटर तयार केलेले साबणाचे द्रावण मिक्स करावे.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता हे मिश्रण शंभर लिटर होईल एवढे पाणी त्यात मिसळायचे आहे. म्हणजे जवळपास 90 लिटर पर्यंत आणखी पाणी मिक्स करावे लागेल. मात्र हे मिश्रण केवळ शंभर लिटर होईल एवढेच तयार करा.
अशा पद्धतीने हे निंबोळी अर्क फवारणीसाठी तयार होते. निंबोळी अर्क ज्या दिवशी तयार होईल त्याच दिवशी फवारणीसाठी वापरून टाकावे. तसेच निंबोळी अर्कांमधून जो स्वतः बाहेर पडतो तो देखील खत म्हणून पिकाला दिला जाऊ शकतो.
हे पण वाचा :- आता सातबारा उतारा ‘या’ मोबाईल एप्लीकेशनवरूनही डाउनलोड करता येणार, 15 रुपये फि लागणार, पहा प्रोसेस