Financial Management Tips:- आपल्याला असे अनेक लोक दिसून येतात किंवा आपल्या बाबतीत देखील असे अनेकदा घडत असेल की आपण खूप चांगल्या प्रकारे पैसे कमवतो. परंतु महिन्याच्या शेवट येईपर्यंत आपले बँक खाते रिकामे होते व आपल्याकडे एक रुपया देखील शिल्लक राहत नाही.
अशा प्रसंगी जर पैशांची गरज भासली तर मात्र आपल्याला इतरांकडे हात पसरावे लागतात. म्हणजे चांगल्या प्रकारे पैसे कमवून देखील आपल्याकडे पैसे न राहणे यामागे आपल्याच काही चुका कारणीभूत ठरतात. त्यामुळे तुम्हाला जर स्वतःचे आर्थिक भविष्य किंवा आपल्या हातात पैसा राहावा असे वाटत असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते.
जर तुम्ही काही महत्त्वाचे नियम स्वतःला लावून घेतले तर तुम्ही जेवढे पैसे कमवतात त्या माध्यमातून देखील तुमच्याकडे पैसा वाचण्यास किंवा पैशांची बचत होण्यास मदत होईल व कधीही पैशांची कमतरता किंवा तंगी तुम्हाला भासणार नाही.
या गोष्टीची काळजी घ्या,नाही भासणार पैशांची कमतरता
1- सगळ्यात आधी महिन्याचा बजेट बनवा- जेव्हा पगार खात्यामध्ये येतो तेव्हा बरेच जण ऑनलाइन पेमेंट करून भरपूर पैसे खर्च करतात. परंतु तुम्हाला जर पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही महिना सुरू झाला की तुमचा घरगुती बजेट तयार करणे गरजेचे आहे व त्या बजेटनुसार सगळा खर्च करावा. यामध्ये अनावश्यक होणारा खर्च ताबडतोब थांबवा व दर महिन्याला बचत करण्याची सवय लावावी.
2- इमर्जन्सी फंड म्हणजे आपत्कालीन निधी तयार करा- आयुष्यामध्ये केव्हा कोणती गोष्ट उद्भवेल व जास्त प्रमाणात पैशांची गरज भासेल याची कुठल्याही प्रकारची कुठलीही शाश्वती नसते. कधीही आरोग्याची परिस्थिती उद्भवते व वैद्यकीय खर्च करावा लागू शकतो.
अशावेळी मात्र तुमची जर काही बचत असेल तर ती पूर्णपणे संपते. याकरता तुम्ही सात ते बारा महिन्यापर्यंत खर्चा एवढ्या रकमेचा आपत्कालीन निधी तयारच ठेवावा. आपत्कालीन निधी तुम्हाला आणीबाणीच्या आर्थिक कालावधीत मदत करतो आणि तुमची बचत तशीच राहते.
3- क्रेडिट कार्डचा वापर जपून करा- आता क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे व क्रेडिट कार्डवर अनेक प्रकारच्या ऑफर्स मिळत असतात. अशा प्रकारचे ऑफर्स आणि डिस्काउंटमुळे बऱ्याचदा क्रेडिट कार्ड वरून अनावश्यक खर्च केला जातो व अनेक वेळा हा खर्च इतका असतो की क्रेडिट कार्डवरुन खर्च केलेली रक्कम आपल्याला फेडता येणे अशक्य होते
आणि नंतर कर्जाच्या जाळ्यात आपण अडकतो व जास्त व्याज आपल्याला द्यावे लागते. त्यामुळे तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरत असाल तर सगळ्यात अगोदर त्याचा वापर करताना खूप काळजीपूर्वक आणि शहाणपणाने करणे गरजेचे आहे.
4- पैशांची बचत करा परंतु गुंतवणूकीला प्राधान्य द्या- तुम्ही दर महिन्याला पैसे वाचवतात परंतु ते लॉकरमध्ये किंवा कपाटात ठेवत असाल तर त्याचा काही उपयोग होत नाही.
त्यामुळे बचत केलेल्या पैशांची गुंतवणूक करणे खूप गरजेचे आहे व या गुंतवणुकीवर तुम्हाला व्याज मिळते व तुमचे पैसे वाढतात. त्यामुळे केलेली बचत तुम्ही दर महिन्याला घरी ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवावी.
5- वेगवेगळ्या कालावधीच्या गुंतवणूक योजना निवडा- आपल्याला काही गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा पैशांची गरज असते. अशाप्रसंगी तुम्हाला पैसा कामात यावा म्हणून तुम्ही दीर्घकालीन आणि अल्पमुदतीच्या गुंतवणूक योजनांची विभागणी करून वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करावी.
समजा तुम्हाला जर मध्येच पैशांची गरज भासली व तुम्ही अल्पकालीन योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्ही या ठिकाणच्या पैशांचा वापर तुमच्या गरजे वेळी करू शकतात व दीर्घ मुदतीसाठी केलेली गुंतवणूक सुरक्षित राहते.
गुंतवणुकीमध्ये विविधता ठेवावी व तुमचे पैसे तुम्ही म्युच्युअल फंड, शेअर बाजार तसेच सोने, मुदत ठेव योजना, आरडी अशा पर्यायांमध्ये गुंतवावेत.
6- रिटायरमेंट प्लॅनिंग बनवा- एकेक दिवसांनी प्रत्येकाचे वय वाढत राहते व व्यक्ती उतारवयाकडे वाटचाल करत असतो. अशा उतारवयाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पैशांची आवश्यकता असेल व उतारवयामुळे तुमचे शरीर कष्ट करण्यासाठी सक्षम नसते.
त्यामुळे तुम्हाला अशा परिस्थितीत पैसा उपलब्ध व्हावा किंवा तुमच्या हातात पैसा राहावा म्हणून तुम्ही तरुणपणापासूनच तुमचे रिटायरमेंट किंवा सेवानिवृत्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे.
जेणेकरून तुम्हाला उतारवयामध्ये कुणाकडून पैसे मागावे लागणार नाहीत. याकरिता तुम्ही अनेक महत्त्वाच्या अशा पेन्शन योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात.
7- लाईफ आणि हेल्थ इन्शुरन्स खरेदी करा- बरेचजण आजही विमा घेण्याला प्राधान्य देत नाहीत व त्याला अनावश्यक खर्च मानतात. परंतु खरे पाहायला गेले तर कठीण कालावधीमध्ये याचा खूप मोठा फायदा होतो.
आरोग्य विमा हा तुम्हाला आजारपणाच्या कालावधीत फायद्याचा ठरतो. तर जीवन विमा तुमच्या कुटुंबाला सुरक्षितता देण्याचे महत्त्वपूर्ण काम करतो. त्यामुळे जीवनातील एक आवश्यक आणि महत्त्वाचा खर्च म्हणून विम्याचा विचार करावा व विम्याची निश्चितपणे खरेदी करावी.
8- अनावश्यक खर्च टाळावा- आजकाल ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर दिसून येतो व अशा पद्धतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवावे व रोख रक्कम खर्च करण्याची सवय लावावी. तसेच हॉटेलिंग,
दारू व सिगारेट इत्यादी सारखे व्यसन असेल तर ताबडतोब यावरील खर्च कमी करावा किंवा असले व्यसन बंद करावेत. तसेच बऱ्याचदा मोठेपणा मिरवण्यासाठी अनावश्यक खर्च केला जातो. अशा प्रकारचा खर्च कधीच करू नये व तुमचे उत्पन्न पाहूनच खर्चाचे नियोजन करावे.
9- नवनवीन कौशल्य शिका आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा- तुम्हाला जास्तीचे पैसे कमवायचे असतील तर उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करा. याकरिता तुम्हाला तुमच्यात असलेले कौशल्य वाढवावे लागतील. अशा परिस्थितीत कुठलीही नवीन गोष्ट शिकण्यामध्ये संकोच करू नका.
तुम्ही जर वेगवेगळी कौशल्य सुधारत राहिला तर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये देखील अनेक संधी मिळतात आणि तुमची लवकर प्रगती होते. त्यामध्ये तुम्ही फ्रीलान्सिंग कामे करू शकतात किंवा अर्धवेळ नोकरी किंवा लहान व्यवसाय करून उत्पन्नाचे अतिरिक्त स्त्रोत निर्माण करू शकतात.