Apaar ID Numer:- केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आता प्रत्येक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन प्रक्रियेचा अवलंब केला जात असून जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा वापर हा प्रत्येक क्षेत्रात कसा करता येईल व अवघड कामे सोपी कशी होतील या दृष्टिकोनातून महत्वाची पावले उचलण्यात येत आहेत.
अगदी याच प्रमाणे आता केंद्र आणि राज्य सरकारने शैक्षणिक क्षेत्रामध्ये देखील खूप आमुलाग्र बदल करण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलायला सुरुवात केली आहे व त्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजेच अपार हा उपक्रम आहे.
अपार हा एक स्वतंत्र ओळखक्रमांक असणार असून देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांना तो दिला जाणार आहे व त्यासोबत विद्यार्थ्यांना डिजिलॉकरची सोय देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे. या अंतर्गत ‘एक देश एक विद्यार्थी ओळख’ ही संकल्पना प्रामुख्याने अंमलात आणली जाणार आहे.
अपार क्रमांक किंवा अपार म्हणजे नेमके काय आहे?
अपार याचा जर आपण फुल फॉर्म म्हणजेच पूर्ण रूप बघितले तर ते म्हणजे ऑटोमेटेड परमनंट अकॅडमी अकाउंट रजिस्ट्री अशा पद्धतीचे आहे. हा अपार देशातील पूर्व प्राथमिक ते उच्च शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा बारा अंकी क्रमांक असणारा असून तो प्रत्येक विद्यार्थ्यांचा एक ओळख क्रमांक असणार आहे.
आपल्याला माहित आहे की सध्या प्रत्येक विद्यार्थ्यांची नोंदणी ही यु-डायस म्हणजेच युनिफाईड डिस्ट्रिक्ट अँड इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस या पोर्टलमध्ये करण्यात आलेली आहे व त्याचा व्यक्तिगत शैक्षणिक क्रमांक म्हणजेच पीईएन क्रमांक यामध्ये नोंदवलेला आहे. आता याच पीईएन क्रमांकाची जागा अपार आयडी घेणार आहे.
विद्यार्थ्यांना काय होईल बरं याचा फायदा?
अपार बरोबर विद्यार्थ्यांना डिजिलॉकरची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची शैक्षणिक आणि शिक्षणेतर प्रगती विषयक माहिती या डीजेलॉकर मध्ये सुरक्षित राहणार आहे व या डीजिलॉकर करिता विद्यार्थ्यांना स्वतंत्र ओळखक्रमांक असणे हाच अपारचा उद्देश आहे.
शिक्षणासाठीची मूळ कागदपत्रे या ठिकाणी सहज विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर शाळा बदलायची आहे तर त्याला नव्या शाळेत सगळी कागदपत्रे जमा करण्याची गरज भासणार नाही. कारण अपारच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांचे डिजिलॉकर उपलब्ध असणार आहे.
समजा एखाद्या कंपनीमध्ये नोकरीसाठी जर उमेदवार गेले तर त्याच्या शैक्षणिक पात्रतेची खातरजमा कंपनीला करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागणार नाहीत व ते डीजिलॉकरच्या माध्यमातून त्यांना संबंधित उमेदवाराची शैक्षणिक पात्रता समजण्यास मदत होणार आहे.
कसा मिळेल अपार क्रमांक?
अपार ओळख क्रमांकासाठी शाळांनी पालकांशी संपर्क साधणे गरजेचे आहे. अपार करिता विद्यार्थ्यांचा यु-डायस नोंदणी क्रमांक, जन्मतारीख, लिंग तसेच मोबाईल क्रमांक, आई वडिलांचे नाव, आधार कार्ड वरील नाव तसेच आधार क्रमांक इत्यादी तपशील अत्यावश्यक असणार आहे.
यामध्ये मात्र विद्यार्थ्याचे यु-डायस आणि आधार कार्डवरील नाव सारखे असणे गरजेचे आहे. यामध्ये विद्यार्थी जर 18 वर्षाखालील असेल तर मात्र या प्रक्रियेकरिता पालकांची लेखी संमती घेणे अत्यावश्यक आहे.
या सगळ्या प्रकारच्या माहितीची शाळांना खातरजमा करायची असून त्यानंतर अपार आयडी तयार केला जाईल व जेव्हा अपार आयडी तयार होईल तेव्हा तो डिजिलॉकरशी कनेक्ट केला जाईल व त्याला एज्युलॉकर म्हणून देखील ओळखले जाणार आहे.
डिजिलॉकर हे डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने तयार केलेले एक डॉक्युमेंट वॉलेट असून यामध्ये अधिकृत कागदपत्रे आणि प्रमाणपत्र सुरक्षित ठेवले जातात व गरजेनुसार ती उपलब्ध करून दिली जातात. विशेष म्हणजे डिजिलॉकर मधील कागदपत्रे ही कायद्यानुसार वैध मानली गेली आहेत.