८ जानेवारी २०२५ बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून एक विचित्र घटना समोर आली आहे.ज्या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.शेगाव तालुक्यातील काही गावातल्या लोकांची अचानक केसगळती होण्याचे प्रमाण वाढल्याची बातमी समोर आलीये.नुसती केसगळतीच नाही तर फक्त तिनच दिवसात डोक्यावरचे केस गळून जातात आणि पूर्ण टक्कल पडते म्हणून गावातील नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
अनोळखी रोगाची साथ
बोंडगाव, कालवड, आणि हिंगणा या गावांमध्ये या अनोळखी रोगाची साथ वाढली असून या आजाराची काही गंभीर लक्षणे दिसत आहेत.यामध्ये सगळ्यात आधी डोक्याला खूप खाज येते,मग हळूहळू हातात केस गळून पडतात आणि शेवटी तिसऱ्याच दिवशी पूर्ण केस गळून टक्कल पडते.या आजाराचे वैशिष्ट्य म्हणजे लहान मुले आणि महिलांवर सुद्धा या आजाराचा मोठा परिणाम होत असल्याचे पहायला मिळत आहे त्यामुळे लोकांमध्ये अजूनच भीती वाढली आहे.
जल प्रदूषणाचा परिणाम असल्याची शक्यता
नदीच्या पाण्याचा रोजरोज वापर करणाऱ्या लोकांमध्ये या रोगाचे प्रमाण वाढले आहे म्हणून हा रोग वाढण्याचे कारण जलप्रदूषणाचा परिणाम असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.पण डॉक्टरांच्या अंदाजानुसार हा रोग केमिकल असलेल्या शाम्पूचा वापर केल्यामुळे पसरला असेल असं म्हणणे आहे.पण आश्चर्याची गोष्ट हि आहे कि जे लोक शाम्पूचा वापर करतच नाही त्यांच्यात सुद्धा या रोगाची लक्षण दिसू लागली आहेत.म्हणूनच कदाचित या रोगाचे कारण एखाद्या विषाणूचा फैलाव असू शकतो अशी शक्यता व्यक्त होत आहे.
आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
या रोगामुळे नागरिक खासगी रुग्णालयांत धाव घेत असून,अजूनही या रोगाचं नेमकं कारण आणि निदान मिळालेलं नसल्यामुळे डॉक्टर्स सुद्धा चिंतेत आणि विचारांमध्ये पडले आहे.
नागरिकांच्या सरकारकडून अपेक्षा
शिवसेना शाखाप्रमुख रामेश्वर थारकर यांनी जिल्हा आरोग्य विभागाला निवेदन दिले आहे आणि गावांमध्ये लवकरात लवकर उपचार शिबिरे राबवण्याचे आवाहन केले आहे.स्थानिक प्रशासन या बाबाबत कोणती ठोस उपाय योजना करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
HMPV विषाणू आणि नवीन व्हायरसची शक्यता ?
राज्यात HMPV (ह्युमन मेटा-प्यूमोनिया व्हायरस) मुळे सरकार खाड्कन जागे झाले आहे.नागपूरात या विषाणूचे दोन रुग्ण सापडल्यामुळे टास्कफोर्स स्थापन करण्यात आली आहे.पण बुलढाण्यातील केस गळतीच्या या अनोळखी आजारामुळे नवीन विषाणू आल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
नागरिकांची मागणी
कालवड, बोंडगाव, आणि हिंगणा या गावांमध्ये आरोग्य विभागाने लगेचच ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.आरोग्य विभागाने या अनोळखी विचित्र आजाराचे नेमके कारण शोधून त्वरित उपचार सुरू करा,अशी मागणी नागरिक करत आहे.सरकारने या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास ही समस्या अजूनच भयानक होऊ शकते.बुलढाण्यातीलच नव्हे तर राज्यातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षा करण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.