स्पेशल

‘हेड इंज्युरी’मुळे भारतात दर वर्षी दीड लाख मृत्यू ! अपघात टाळले जाऊ शकतात…

Marathi News : भारतात दर वर्षी एकूण होणाऱ्या मृत्युंपैकी ६० टक्के मृत्यू हे रस्ते अपघातात होतात. यापैकी साधारणत: दीड लाख लोक मेंदुला मार लागून मृत्युमुखी पडतात.

तर १० लाख लोक गंभीर जखमी होतात. त्यामुळे हेड इंज्युरीविषयी जागृती होणे गरजेचे आहे, अशी माहिती साई संस्थानचे न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांनी दिली.

जागतिक हेड इंज्युरी जागरूकता दिनानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. चौधरी म्हणाले, कार अपघातात दोघांचा मृत्यू, डोक्यात वीज पडून महिला ठार, क्रिकेटचा बॉल डोक्याला लागून तरूण जखमी, अशा डोक्याच्या दुखपतीबाबतच्या बातम्या आपण नेहमी ऐकतो, वाचतो व सोडून देतो; परंतु हेड इंज्युरी हा विषय गांभिर्याने घेण्याची गरज आहे.

भारत सरकारच्या रस्ते विकास मंत्रालय व महामार्ग प्राधिकरण यांच्या आकडेवारीनुसार अपघातात मेंदूला मार लागून मृत्यू, जखमी वा अपंगत्व येण्याचे प्रमाण भारतात इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे. हे अपघात टाळले जाऊ शकतात.

यासाठी जागृती गरजेची आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये छोट्या; परंतु खबरदारी घेणाऱ्या सवयी व नियमांचे पालन आपण करायला पाहिजे. फक्त नियमांविषयी जागृती करून चालणार नाही, त्याची अंमलबजावणीदेखील व्हायला पाहिजे. आपल्याकडे नियम आहेत; परंतु ते पाळले जात नाहीत.

परिणामी अनेकांना अपघाती मृत्युला सामोरे जावे लागते. म्हणून डोके दुखापतीविषयी जागृती व्हावी म्हणून अनेक सामाजिक संस्था, रुग्णालये काम करत आहेत. प्रत्येकाने स्वतःच्या जबाबदारीचे भान ठेवून नियम पाळले, काळजी घेतली, तर अपघातात डोक्याला होणाऱ्या दुखापतीचे प्रमाण नक्की कमी होईल.

हेल्मेट कंपल्सरी मोहीम गरजेची

आपल्याकडे वाहतूक नियमात हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे; परंतु आपण त्याला अडचण समजून हेल्मेट वापरण्यास टाळाटाळ करतो. त्यामुळे रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांमध्ये १८ ते ४० वयोगटातील तरुणांचे प्रमाण मोठे आहे.

घरातील कर्ता माणूस गेल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर पडतात. आपल्या पश्चात कुटुंबाची दुरवस्था टाळण्यासाठी आपल्या डोक्याची सुरक्षा आपण घेऊन हेड इंज्युरी टाळण्यासाठी हेल्मेट कंपल्सरी मोहीम गरजेची आहे, असे डॉ. चौधरी म्हणाले.

उपाय काय?

■ दुचाकी चालवताना आवर्जुन हेल्मेट वापरा.

■ कारमध्ये प्रवास करताना सीट बेल्ट लावा.

■ वाहन चालविताना रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करा.

■ औद्योगिक व कामाच्या ठिकाणी सुरक्षा पेहराव व हेल्मेट वापरा.

■ घरात वयोवृद्ध असतील, तर बाथरूम व पायऱ्यांवर चांगली प्रकाश योजना ठेवा.

■ डोक्याला झालेली दुखापत गंभीर किंवा सौम्य असो, त्यावर तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.

 

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office
Tags: Marathi News

Recent Posts