Onion Crop Management : महाराष्ट्रात कांदा या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. हे एक नगदी पीक म्हणून ओळखलं जात असलं तरी देखील मात्र या पिकावर वेगवेगळ्या रोगांचे सावट कायमच पाहायला मिळते. वेगवेगळ्या रोगांमुळे हे पीक संकटात सापडतं आणि उत्पादनात मोठी घट होते.
मुळकुज हा देखील कांदा पिकावर आढळणारा एक महाभयंकर असा रोग. यां रोगामुळे कांदा पिकाच्या उत्पादनात मोठी घट होते. परिणामी याचे वेळीच नियंत्रण करणे कांदा उत्पादकांसाठी आवश्यक आहे.
यामुळे आज आपण मुळकुज हा रोग होऊ नये यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत आणि मुळकुज झाल्यास कोणत्या नियंत्रणाच्या पद्धती किंवा फवारणी दिली पाहिजे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, कांदा पिकासाठी घातक ठरणारा हा रोग बुरशीजनित्त रोग आहे. फ्युजॅरियम ऑक्सिस्पोरम नामक बुरशीमुळे या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांदा पिकाची पात पिवळी पडते. हा पिवळसर पणा कांदा पिकाच्या बुडख्याकडे वाढत जातो. यामुळे कांदापात सुकून जाते. मुळे कुजतात आणि काळसर तपकिरी होतात. यामुळे कांद्याची रोपे सहज उपटत असतात. यामुळे कांदा पिकाची वाढ खुंटते. परिणामी उत्पादनात मोठी घट होत असते.
मुळकुज रोगावर उपचार पद्धती
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रोग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या तर शेतकऱ्यांचा फायदा होतो. यासाठी शेतकऱ्यांनी एकाच जमिनीत कायमच कांद्याचे पीक घेऊ नये म्हणजे पिकाची फेरपालट करावी. तसेच कांदा लागवड करताना जमिनीची खोल नांगरट करून उन्हाळ्यात जमीन तशीच मोकळी सोडावी.
यामुळे जमीन तापते परिणामी जमिनीत असलेले हानिकारक बुरशी देखील नष्ट होते. तसेच या रोगाचा प्रादुर्भाव होऊच नये यासाठी सर्वात महत्त्वाचा असा प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच बीजप्रक्रिया. यासाठी थायरम २ ग्रॅम प्रति किलो या प्रमाणे बीज प्रक्रिया केल्यास फायदा होतो.
जर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून देखील या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर शेतकरी बांधवांनी शेणखतासोबत ट्रायकोडर्मा व्हिरीडी एकरी ५ किलो या प्रमाणात जमिनीत मिसळावे.