Onion Farming : महाराष्ट्रात कांदा या नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरीप रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात या पिकाची शेती पाहायला मिळते. नाशिक जिल्हा कांदा पीक उत्पादनासाठी संपूर्ण देशभरात नावाजलेला आहे. दरम्यान आता जिल्ह्यात कांदा पिकावर टाक्या अर्थातच थ्रिप्स रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळेल.
त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये मोठे चिंतेचे वातावरण आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामात लागवड केलेल्या कांदा पिकावर हा रोग सध्या थैमान घालत आहे. थ्रिप्स या किडीमुळे कांदा पिकाचे 50 ते 60 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. अशा परिस्थितीत या कीटकावर वेळीच नियंत्रण मिळवणे अनिवार्य आहे. रब्बी किंवा उन्हाळी हंगामातील कांद्याची लागवड ही डिसेंबर ते जानेवारी दरम्यान केली जाते.
तसेच या पिकाची काढणी ही मार्च महिन्यात सुरू होते. या थ्रिप्स कीटकाचा प्रादुर्भाव हा रब्बी आणि उन्हाळी हंगामातील कांदा पिकावर अधिक असतो कारण की या दरम्यान असलेले वातावरण हे या कीटकांसाठी पोषक असल्याचे सांगितले जाते. हे कीड आपल्या प्रारंभी अवस्थेत छोटी आणि पिवळसर रंगाची असते मात्र नंतर काळपट असा रंग या किडीचा बनतो.
या किडीमुळे कांदा पातीवर सुरुवातीला पांढरे डाग तयार होतात यानंतर मग हे डाग पिवळसर पांढरे होतात. असे डाग पडत असल्याने या थ्रिप्स कीटकामुळे तयार होणाऱ्या रोगाला टाक्या रोग असं खानदेशात संबोधलं जात. हे कीड हे प्रामुख्याने पातीच्या आतील भागात किंवा मग गाभ्यात असते. ही कीड पाती मधील रस शोषून घेते परिणामी पात वाकते.
यामुळे पिकाची वाढ खुंटते. कांदा पोसला जात नाही शिवाय वजनात घट होते. यामुळे उत्पादनात घट होते. नाशिक जिल्ह्यासमवेतच राज्यातील बहुतांशी भागात या कीटकाचा सध्या स्थितीला प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत या कीटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकरी बांधव वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. दरम्यान आज आपण या कीटकावर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
खरं पाहता शेतकरी बांधवांना कोणत्याही पिकातून चांगले दर्जेदार आणि निरोगी उत्पादन घेण्यासाठी सर्वप्रथम बिजोपचार करण्याचा सल्ला दिला जातो. टाक्या (थ्रीप्स) ही कीड कांदा पिकावर येऊ नये यासाठी देखील कांदा पुनर्लागवडीपुर्वी रोपांची मुळे कार्बोसल्फान २ मिली प्रति लिटर पाण्यात टाकून त्यात बुडवून बिजोपचार करण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.
तसेच कांदा लागवडीनंतर १०-१५ दिवसांनी व १५ दिवसांच्या अंतराने फिप्रोनील १ मिली किंवा कार्बोसल्फान २ मिली किंवा प्रोफेनोफोस १ मिली प्रति लिटर पाण्यात टाकून त्याप्रमाणे फवारणी केल्यास या थ्रीप्स कीटकांपासून कांदा पीक वाचवले जाऊ शकते. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की एकाच कीटकनाशकांचा वारंवार वापर केल्यास किडीची प्रतिकारक्षमता वाढते परिणामी किटकनाशकांचा देखील असर किडीवर होणार नाही.
यामुळे शेतकऱ्यानी आलटून पालटून कीटकनाशकांची फवारणी तज्ञांच्या सल्ल्याने केली पाहिजे. फवारणी करताना नेहमी तज्ञांच्या सल्ल्याने स्टिकर म्हणजे चिकट द्रव्याचा वापर केला पाहिजे. यामुळे कीटकनाशकाची केलेली फवारणी कांदापातीवर परफेक्ट बसते आणि यामुळे चांगला रिझल्ट मिळू शकतो.
त्याचप्रमाणे जे शेतकरी बांधव जैविक पद्धतीने कांदा पिक लागवड करतात ते शेतकरी बिव्हेरिया बॅसियाना, निम तेल, करंज तेल यासारख्या जैविक किटकनाशकांचा वापर करून या थ्रिप्स कीटकांवर नियंत्रण मिळवू शकणार आहेत.