Onion Rate : लोकसभा निवडणुकीत कांद्याने महायुतीला लोळवलं. लोकसभेच्या निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्यावरून महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला. यामध्ये काही केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश होता हे विशेष. दरम्यान आता लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही कांद्याचा मुद्दा अंगलट येऊ नये यासाठी सरकारकडून सावधगिरीने पावले टाकली जात आहेत.
गत सप्टेंबर महिन्यात केंद्राने कांदा निर्यातीसाठी लागू असणारे निर्बंध शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. कांदा निर्यातीसाठी लागू असणारे निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले.
सोबतच निर्यातीसाठी लागू असणारे किमान निर्यात मूल्य हटवले गेले. आता या निर्णयाचा फायदा कांदा उत्पादकांना होतांना दिसतोय. कांद्याला गत काही दिवसांपासून विक्रमी भाव मिळतोय.
गेल्या महिन्याभरापासून कांद्याचे बाजारभाव 4000 रुपये प्रति क्विंटल या भाव पातळीवर स्थिरावले आहेत. तसेच काही बाजारांमध्ये कांद्याचे दर हे 5000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचले आहेत.
दरम्यान कालच्या लिलावात राज्यातील एका महत्त्वाच्या बाजारामध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक सहा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार काल अर्थातच 20 ऑक्टोबरला झालेल्या लिलावात राज्यातील रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
या मार्केटमध्ये कालच्या लिलावात उन्हाळी कांद्याला किमान 5000, कमाल 6000 आणि सरासरी 5500 असा विक्रमी भाव मिळाला आहे. महत्त्वाचे म्हणजे बाजार अभ्यासकांनी आगामी काही दिवस कांद्याचे दर असेच तेजीत राहू शकतात असा अंदाज वर्तवला आहे.
जोपर्यंत नवीन लाल कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत नाही तोपर्यंत दर तेजीत राहणार आहेत. काही तज्ञांनी तर डिसेंबर पर्यंत बाजारभाव असेच राहणार असे म्हटले आहे.
त्यामुळे आगामी काळात कांद्याचे दर कसे राहणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. तथापि सध्या जो भाव मिळतोय तसेच भाव जर आगामी काळातही कायम राहिलेत तर याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.