Onion Rate : नुकत्याच काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. महायुतीच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला. यामागे वेगवेगळी कारणे असल्याचे जाणकारांनी सांगितले. मात्र सर्वात मोठे कारण होते शेतकऱ्यांची नाराजी. लोकसभा निवडणुकीच्या आधी दुधासह कांद्याला अपेक्षित बाजार भाव मिळत नव्हता अन याचाच फटका महायुतीला बसला.
ज्या ठिकाणी कांद्याचे सर्वात जास्त उत्पादन घेतले जात होते त्या ठिकाणी महायुतीचे अनेक उमेदवार पराभूत झालेत. अहिल्यानगर मध्ये तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण विधानसभा मतदारसंघ या दोन्ही जागा महायुतीला गमवाव्या लागल्यात.
शेतकऱ्यांची नाराजी लोकसभा निवडणुकीच्या निकालातूनच दिसून आली असल्याने आता आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष न करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारकडून गांभीर्याने आणि सकारात्मक विचार होत आहे.
दरम्यान गत लोकसभा निवडणुकीसारखा पराभव विधानसभा निवडणुकीत होऊ नये यासाठी केंद्रातील सरकारने सप्टेंबर मध्ये कांदा निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे कांद्याच्या निर्यातीला चालना मिळत असून बाजार भाव सुधारले आहेत. गेल्या एका महिन्यापासून कांद्याला बाजारात चांगला दर मिळतोय.
गेल्या एका महिन्याच्या काळात कांद्याचे दर चार हजार रुपयांवर स्थिर आहेत. खरे तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी शेतकऱ्यांनी दुधाला आणि कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याची नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. महायुतीच्या नेत्यांच्या सभांना शेतकऱ्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली होती.
याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला. आता विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी आपल्याला जड भरू नये यासाठी सप्टेंबर मध्ये कांदा निर्यातीसाठी लागू असणारे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. कांदा निर्यातीसाठी लागू असणारे किमान निर्यात मूल्य रद्द करण्यात आले असून निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के करण्यात आले आहे.
यामुळे कांदा निर्यातीला चालना मिळाली आणि बाजार भाव सुधारलेत. दरवर्षी नवीन कांद्याची बाजारात आवक झाल्यानंतर कांद्याचे दर घसरतात यंदा मात्र तसेही घडलेले नाही. यावर्षी परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे झालेले नुकसान यामुळे बाजार भाव तेजीत आहेत. किरकोळ चढउतारासह कांद्याचे दर हे गेल्या महिन्यापासून 4000 रुपये प्रति क्विंटल या भाव पातळीवर स्थिर असल्याचे दिसते.
सध्या कांद्याला काय दर मिळतोय?
राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती शुक्रवारी झालेल्या लिलावात एक नंबर गावरान कांद्याला चार हजार दोनशे ते चार हजार 700 आणि नवीन एक नंबर लाल कांद्याला तीन हजार आठशे ते चार हजार तीनशे यादरम्यान भाव मिळाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हे बाजार भाव डिसेंबर महिन्यापर्यंत असेच राहू शकतात असा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.
बाजार अभ्यासकांनी जोपर्यंत मोठ्या प्रमाणात नवीन लाल कांदा बाजारात येत नाही तोपर्यंत हे दर असेच राहणार असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे कांदा निर्यात शुल्क कमी करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यामुळे झालेली दरवाढ याचा आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला कसा फायदा मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.