Palakhi Marg : येत्या वर्षात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका राहणार आहेत शिवाय पुढील वर्षी लोकसभा निवडणुका देखील होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र शासनाकडून तसेच राज्य शासनाकडून रस्ते विकासाची वेगवेगळी प्रकल्पे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून देशभरात वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जोमात कार्य सुरू आहे.
राज्यातही वेगवेगळे महामार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबई नागपूर समृद्धी महामार्गचे काम जलद गतीने पूर्ण केले जात असून याचा दुसरा टप्पा अर्थातच शिर्डी ते मुंबई हा यावर्षीअखेर सुरू करण्याचा मानस शासनाचा असून याचा पहिला टप्पा ऑलरेडी प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे.
दरम्यान आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्ग बाबत एक मोठी माहिती दिली आहे. या दोन्ही पालखी मार्गांचे जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. काही ठिकाणी मात्र पालखी मार्गासाठी भूसंपादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मात्र यावर लवकरच तोडगा काढला जाणार असून हे दोन्ही पालखी मार्ग यंदा पूर्ण होतील आणि येत्या नवीन वर्षात या पालखी मार्गांचे लोकार्पण होईल अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. गडकरी यांनी नुकत्याच या महामार्गाची पाहणी केली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाबाबत थोडक्यात
गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग 235 किलोमीटर लांबीचा आहे. या पालखी मार्गाचे एकूण सहा टप्पे असून यासाठी 8000 कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. यापैकी पाच टप्प्यांचे काम सुरू झाले असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून या पालखी मार्गाचे बांधकाम केले जात आहे.
सहावा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही मात्र लवकरच हा देखील टप्पा सुरू होणार आहे. हडपसर ते दिवे घाट दरम्यान हा सहावा टप्पा आहे. यादेखील टप्प्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. यासाठी भूसंपादन देखील लवकर सुरु होणार असून प्रत्यक्षात कामही जलद गतीने सुरू करण्याचा मानस शासनाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
गडकरी यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहोळ ते वाकरी या टप्प्यासाठी दीड हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. याचे काम हे 91 टक्के पूर्ण झाले आहे.
वाखरी ते खुडूस 97 टक्के काम पूर्ण झाले आहे.
कुडूस ते धर्मपुरी याचे 90% काम पूर्ण झाले आहे.
धर्मपुरी ते लोणंद हे काम 48% पूर्ण झाले आहे.
लोणंद ते दिवे घाट मात्र 20 टक्के काम पूर्ण झाले आहे.
या पाच टप्प्यांव्यतिरिक्त सहाव्या टप्प्याचे काम म्हणजेच हडपसर ते दिवे घाट लवकरच पूर्ण केलं जाईल असं गडकरी यांनी सांगितलं.
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग बाबत थोडक्यात
संत तुकाराम महाराज पालखी मार्ग बाबत बोलायचं झालं तर हा मार्ग तीन टप्प्यात बांधला जात आहे. याची एकूण लांबी 137 किलोमीटर आहे. यासाठी 5000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले बोडसे या तीन टप्प्यात या संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम केले जात आहे. यापैकी पाटस ते बारामती टप्प्याचे काम 85 टक्के पूर्ण झाला आहे. उर्वरित टप्प्यांचे काम 40 टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. येत्या तीन महिन्यात या मार्गाचे देखील बहुतांशी काम पूर्ण होईल असा विश्वास यावेळी गडकरींनी व्यक्त केला आहे.