Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे मान्सून संदर्भात. मान्सून जाता जाता मनसोक्त बरसणार असे बोलले जात आहे. खरे तर गेल्या काही दिवसांपासून साऱ्यांना मान्सूनच्या परतीच्या पावसाचे वेध लागले आहे. दरवर्षी सप्टेंबर महिना सुरू झाला की मान्सूनचा परतीचा प्रवास कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जातो.
सध्या राज्यातील शेतकरी बांधव याच बाबत सातत्याने विचारणा करत आहेत. अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज जाहीर केला आहे. आपल्या अधिकृत youtube चैनल वर पंजाब रावांनी पुढील पंधरा दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.
कसं असणार पुढील पंधरा दिवसाच हवामान?
महाराष्ट्रात पुढील पंधरा दिवस म्हणजेच जवळपास 2 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार, पावसाला कधीपासून सुरुवात होणार याबाबत पंजाब रावांनी माहिती दिली आहे. आज पासून पुढील दोन दिवस म्हणजेच 20 सप्टेंबर पर्यंत राज्यात पावसाची विश्रांती पाहायला मिळणार आहे.
त्यामुळे या काळात शेतकऱ्यांनी शेती कामे करून घेणे अपेक्षित आहे. कारण की 21 तारखेपासून पुन्हा राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. काही भागांमध्ये तर 20 सप्टेंबर पासूनच पावसाला सुरुवात होणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.
महत्त्वाचे म्हणजे राज्यात तब्बल 2 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. 20 सप्टेंबरला सर्वप्रथम पूर्व विदर्भात पाऊस सक्रिय होणार आहे. त्यानंतर 21 सप्टेंबरला राज्यातील पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.
यानंतर मग हा पाऊस राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आपले पाय पसरवणार आहे. 21 सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या काळात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, खानदेश आणि मराठवाडा या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या काळात राज्यात खूपच मोठा पाऊस पडणार असून काही ठिकाणी पूरस्थिती तयार होण्याची देखील शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष सावध राहणे आवश्यक आहे. या काळात वीज पडण्याच्या देखील घटना घडू शकतात यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पंजाब रावांनी केले आहे.
या काळात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्यातील काही प्रमुख धरणे फुल भरणार आहेत. विशेषता 25 ते 27 सप्टेंबर दरम्यान नाशिककडे तुफान पावसाची शक्यता आहे. एवढेच नाही तर पुढील ऑक्टोबर महिन्यातही पंजाब रावांनी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नवरात्र उत्सवात, विजयादशमी आणि दसऱ्याला राज्यात खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे.
ऑक्टोबरच्या शेवटी सुद्धा पावसाचे तांडव पाहायला मिळू शकते असे पंजाबरावांनी आपल्या आधीच्या अंदाजात म्हटले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी विशेष सावध राहून जेव्हा पावसाची उघडीप असेल त्या काळात शेतीची कामे उरकून घेणे अपेक्षित आहे.