महाराष्ट्रमध्ये यावर्षी सगळीकडे पाऊस पाण्याच्या बाबतीत आबादानी असून राज्यातील जवळपास संपूर्ण जिल्ह्यांमध्ये शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची समस्या जवळजवळ मिटलेली आहे. राज्यातील छोट्या आणि मोठ्या जलसिंचन प्रकल्प यावर्षी पाण्याने तुडुंब भरले असून सगळीकडे पावसाच्या बाबतीत यावर्षी तरी समाधानाचे वातावरण आहे. त्यासोबतच राज्यातील मराठवाडा आणि विदर्भासारख्या पट्ट्यात तर गेल्या काही दिवसात पावसाने शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील केलेले आहे.
या ठिकाणी खरिपाची काढणीला आलेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे व डोळ्यासमोर पीक नष्ट झाल्यामुळे ऐन सणासुदीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. त्यामुळे झालेल्या या नुकसानीचे पंचनामे करून राज्य सरकारने तातडीने नुकसान भरपाई देणे खूप गरजेचे असल्याची मागणी देखील शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात आहे.
तसेच आताचा जो काही कालावधी आहे तो प्रामुख्याने सोयाबीन तसेच कापूस पिकाचा काढणीचा कालावधी असून याच कालावधीत राज्यातील प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख त्यांनी मात्र धडकी भरवणारा पावसाचा अंदाज वर्तवला असून राज्यातील वातावरणामध्ये बदल होत असल्याने गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
21 सप्टेंबर पासून सलग अकरा दिवस कोसळणार मुसळधार पाऊस
याबाबत सविस्तर वृत्त असे की, राज्यातील वातावरणामध्ये बदल होत असून गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पावसाने जी काही विश्रांती घेतली होती त्यानंतर मात्र आता पुन्हा पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबरावांनी वर्तवली असून राज्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरु होण्याची शक्यता देखील त्यांनी बोलून दाखवलेली आहे.
येत्या 21 सप्टेंबर पासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणारा असल्याचा इशाराच त्यांनी दिलेला आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्रात कोरड हवामान राहणार आहे. परंतु त्यानंतर मात्र राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यामध्ये 21 सप्टेंबर पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजेच अकरा दिवस मुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती पंजाबरावांनी दिली असून राज्यातील नांदेड,
लातूर, परभणी, सांगली, धाराशिव, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, कोकण, बीड आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. या उल्लेख केलेल्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार असल्यामुळे या ठिकाणाच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन देखील पंजाबराव यांनी केलेले आहे.
त्यामुळे अगोदरच मराठवाडा आणि विदर्भ सारख्या ठिकाणी शेती पिकांचे नुकसान झालेले असताना आता मात्र नेमके कापूस व सोयाबीन सारख्या पिकांची काढणी सुरू होण्याचा कालावधी असून याच कालावधीत पावसाने जर हजेरी लावली तर मात्र शेतकऱ्यांचे अमाप नुकसान होण्याची शक्यता असून जर असे झाले तर यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसू शकतो.