Petrol Diesel Price Decrease : गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता बेजार झाली आहे. नोकरदार वर्गाचा महिन्याकाठी येणारा पैसा हा घर खर्च भागवण्यातचं निघून जात आहे. कुठल्याच प्रकारची बचत करता येत नसल्याने नोकरदार वर्ग आपल्या भविष्यासाठी मोठ्या चिंतेत आहे.
गॅस सिलेंडर, खाद्यतेल आणि इंधनाच्या वाढलेल्या किमती सर्वसामान्यांचे बजेट बिघडवत आहेत. महत्वाचे म्हणजे आता सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे आणि सणासुदीचा हंगाम सुरू झाला की महागाई आणखी वाढत असते.
पण, यावेळी ऐन सणासुदीच्या हंगामात सर्वसामान्यांना दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे. दिवाळीच्या आधी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील असे वृत्त नुकतेच हाती आले आहे.
पुढल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आता आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात कां होणार? याच संदर्भात थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ऑक्टोबर मध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याचे कारण
मीडिया रिपोर्ट नुसार, जगातील प्रमुख क्रूड ऑइल उत्पादक देश सौदी अरेबिया आशियामध्ये विकल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाच्या किमती कमी करणार आहे. जवळपास सर्वच श्रेणीच्या क्रूड ऑइल ची किंमत सौदी अरेबिया कडून कमी केली जाणार आहे.
मध्यपूर्व भागातील बेंच मार्क दुबईतील घसरणीमुळे सौदी अरेबियाकडून हे महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार असल्याचा दावा देखील प्रसारमाध्यमांमध्ये केला जातोय. भारतातही सौदी अरेबियातून क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणात आयात होत असते.
यामुळे सौदी अरेबियाने हा निर्णय घेतला तर भारतातील प्रमुख तेल विपणन कंपन्या पेट्रोल, डिझेल आणि एटीएफ इंधन च्या किमती कमी करतील. अरब लाईट क्रूडची ऑफिशियल सेल प्राईस म्हणजेच अधिकृत विक्री किंमत पुढल्या महिन्यात प्रति बॅरल तब्बल 50 ते 70 सेंट्सने कमी होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे क्रूड ऑइल च्या किमती कमी होण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण दिले जात आहे. ते म्हणजे चीनमध्ये सातत्याने क्रूड ऑइल ची मागणी कमी होत आहे. चीनमधील मॅन्युफॅक्चर आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्ही सेक्टरमध्ये अभूतपूर्व मंदी पाहायला मिळत आहे.
यामुळे तेथे क्रूड ऑइलची मागणी घटली आहे. साधारणता सप्टेंबर महिन्यात इंधनाची मागणी वाढत असते. मात्र यंदा तसे काही घडतं नाहीये. मागणी वाढण्याऐवजी घटत आहे.
हीच गोष्ट लक्षात घेता पुढल्या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती भारतात मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात असा दावा आता केला जाऊ लागला आहे.