Post Office Scheme : शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळते. मात्र खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना निवृत्तीनंतर पेन्शन मिळत नाही. यामुळे खाजगी क्षेत्रातील लोकांना निवृत्तीनंतर उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन उपलब्ध नसते. म्हणून रिटायरमेंट नंतर मिळणारा ग्रॅच्युटीचा पैसा म्हणजेच निवृत्ती निधी अनेकजण त्यांच्या सोयीनुसार वापरतात आणि विविध ठिकाणी गुंतवणूक करतात जेणेकरून त्यांचे पैसे कालांतराने वाढत राहतील.
गुंतवणुकीच्या बाबतीत कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे बहुतेक वडीलधाऱ्यांना आवडत नाही. यामुळे सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याला प्राधान्य दाखवले जाते. ज्येष्ठ नागरिक नेहमीच अशा योजनांमध्ये गुंतवणूक करतात जिथून त्यांना खात्रीशीर परतावा मिळेल.
दरम्यान आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशाच एका सुरक्षित योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. वृद्धांसाठी पोस्ट ऑफिसमध्ये अशी एक योजना चालवली जाते, ज्यामध्ये त्यांना चांगले व्याज दिले जात आहे. सीनियर सिटीजन सेविंग स्कीम अर्थातच ज्येष्ठ नागरिक बचत योजना असे या योजनेचे नाव आहे.
या योजनेद्वारे, वृद्धांची इच्छा असल्यास, ते केवळ व्याजातून 12,30,000 रुपये कमवू शकतात. दरम्यान आता आपण या योजनेतून बारा लाख तीस हजार रुपये कसे कमावले जाऊ शकतात याचे गणित समजून घेणार आहोत.
सीनियर सिटीजन सेविंग स्कीमचा व्याजदर किती आहे?
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक ठेव योजना आहे. यामध्ये ५ वर्षांसाठी ठराविक रक्कम जमा केली जाते. ज्येष्ठ नागरिक या योजनेत जास्तीत जास्त 30,00,000 रुपये गुंतवू शकतात, तर किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे.
सध्या, SCSS वर 8.2 टक्के व्याजदर लागू आहे. जसे आम्ही तुम्हाला सांगितले की तुम्ही या योजनेत जास्तीत जास्त 30,00,000 रुपये जमा करू शकता. जर तुम्ही ही रक्कम या योजनेत गुंतवली तर तुम्हाला 5 वर्षात 8.2% दराने 12,30,000 रुपये व्याज मिळेल. प्रत्येक तिमाहीत ₹61,500 व्याज म्हणून जमा केले जातील. अशा प्रकारे, 5 वर्षानंतर तुम्हाला एकूण ₹ 42,30,000 मॅच्युरिटी रक्कम मिळेल.
पोस्टाच्या या योजनेत कोणाला गुंतवणूक करता येते ?
६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती गुंतवणूक करू शकते. त्याचवेळी व्हीआरएस घेणारे नागरी क्षेत्रातील सरकारी कर्मचारी आणि संरक्षणातून निवृत्त होणाऱ्या लोकांना काही अटींसह वयात सवलत दिली जाते. योजना 5 वर्षांनी परिपक्व होते.
जर तुम्हाला या योजनेचे लाभ 5 वर्षांनंतरही चालू ठेवायचे असतील, तर ठेव रकमेच्या मॅच्युरिटीनंतर तुम्ही खात्याचा कालावधी तीन वर्षांसाठी वाढवू शकता. ही मुदत मॅच्युरिटीच्या 1 वर्षाच्या आत वाढवता येते. मुदतपूर्तीच्या तारखेला लागू होणाऱ्या दराने विस्तारित खात्यावरील व्याज उपलब्ध आहे. कलम 80C अंतर्गत कर सवलतीचा लाभ SCSS मध्ये उपलब्ध आहे.