स्पेशल

Poultry Farming : कडकनाथला विसरा आणि ह्या देशी कोंबड्या पाळा ! होईल मोठी कमाई

Poultry Farming:-  भारतीय शेतकरी पूर्वपारपासून शेती करत असताना त्यासोबत अनेक प्रकारची जोडधंदे करत आलेला आहे. यामध्ये पशुपालन, शेळीपालन, मेंढी पालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायांचा समावेश करता येईल. जसे शेती प्रगत होत गेली तसे तसे शेती व्यवसायाला पूरक असलेले धंदे देखील विकसित होत गेले.

प्रत्येक व्यवसायाला आता व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले जात असून त्या दृष्टीने त्यामध्ये प्रयत्न केले जात आहेत. उदाहरणच घ्यायचं झालं तर कुक्कुटपालन व्यवसाय हा  घरासमोरील परस बागेपुरता मर्यादित राहिला नसून त्याला आता व्यावसायिक स्वरूप आलेले आहे. व्यावसायिक दृष्टिकोनातून कंत्राटी पद्धतीने पोल्ट्री फार्मिंग हा नवा ट्रेंड शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाला असून या माध्यमातून आता मोठे मोठे पोल्ट्री शेड उभारून ब्रॉयलर कोंबडी पालन केले जात आहे.

एवढेच नाही तर काही देशी कोंबड्यांच्या जाती देखील आता शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरत असून आर्थिक उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टिकोनातून फायद्याच्या ठरत आहेत. जर आपण भारतातील विविध ठिकाणच्या राज्यांचा विचार केला तर अनेक तरुण शेतकरी शेती पूरक व्यवसाय मधून खूप चांगले आर्थिक उत्पन्न मिळवत आहेत.

अगदी याच पद्धतीने आपण बिहार राज्यातील मुजफ्फरपुर  जिल्ह्यातील चखेलाल या गावचे रहिवासी राजकुमार चौधरी यांच्या कुक्कुटपालन व्यवसायाचा विचार केला तर या तरुण शेतकऱ्याचा देशी कोंबडी पालनाचा मोठा व्यवसाय आहे. एवढेच नाही तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकुमार चौधरी यांना गौरवण्यात आलेले आहे.

 राजुकुमार करतात या देशी कोंबड्यांचे पालन

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, बिहार राज्यातील मुजफ्फरपूर जिल्ह्यातील चखेलाल हे गाव असून या ठिकाणी राजकुमार चौधरी यांचा देशी कोंबडी पालनाचा एक मोठा व्यवसाय आहे. या व्यवसायातील त्यांचे यश पाहून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देखील त्यांना गौरवले आहे. साधारणपणे 22 वर्षापासून राजकुमार कुक्कुटपालन व्यवसाय करत आहे. कुक्कुट पालन व्यवसाय करताना ते प्रामुख्याने देशी कोंबड्यांच्या विविध प्रकारच्या जातीचे पालन करतात.

परंतु यामध्ये वनराजा आणि ग्रामप्रिया या प्रमुख देशी कोंबड्यांच्या जाती ते पाळतात. त्यांच्या या कुकूटपालन व्यवसाय विषयी माहिती देताना ते सांगतात की एक देशी कोंबडा पूर्णपणे तयार होण्याकरिता तीन महिन्यांचा कालावधी जातो व या कालावधीमध्ये एका कोंबड्याचे वजन एक किलो होते. तसेच देशी कोंबड्यांच्या पिल्लांना देखील बाजारपेठेमध्ये

मोठी मागणी असते. साधारणपणे 30 रुपये दराने एक देशी कोंबडीचे पिल्लू विकले जाते व पूर्ण वाढ झालेल्या कोंबड्याला प्रति किलो चारशे रुपये इतका बाजार भाव मिळतो.

त्यांच्या म्हणण्यानुसार दहा हजार रुपये भांडवल गुंतवून कोणीही या व्यवसायातून तीन ते चार महिन्यात चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न आरामात कमवू शकतो. तसेच त्यांच्या मते देशी कोंबडी पालनाचा खर्च हा इतर जातींच्या तुलनेत कमी असतो. कारण देशी कोंबड्यांना खाद्याची गरज जास्त भासत नाही. त्यांना एखाद्या मोकळ्या जागेत किंवा शेतात जरी सोडले तरी ते गवत खाऊन त्यांचे उदरनिर्वाह करू शकतात.

त्यामुळे खाद्यावरील खर्च वाचतो. कारण कुक्कुटपालनाचा सर्वात जास्त खर्च हा कोंबड्यांच्या खाद्यासाठी होतो. सध्या त्यांच्या कुकूटपालन व्यवसायाचा विचार केला तर त्यांच्याकडे सहाशे कोंबडे आहेत. एक कोंबडा साधारणपणे एक हजार ते बाराशे रुपयांना ते विकतात. या जातीच्या कोंबड्यांना बाजारपेठेत चांगली मागणी असते. म्हणून ते आवर्जून सांगतात की आजच्या तरुण शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी कोंबडी पालन व्यवसायामध्ये करिअर करण्यास कुठल्याही प्रकारची हरकत नाही.

 

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts